६३ हजार मीटर धाग्यापासून बनवली अनोखी शिवपार्वती प्रतिमा…
सिंधुदुर्ग, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील नेरूर गावाच्या हर्षद मेस्त्रीने कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या सहाय्याने तब्बल १५ बाय १५ फुट ऊंचीची शिवशंकर आणि माता पार्वतीची हुबेहुब प्रतिमा साकारली असून ही प्रतिमा बनविण्यासाठी त्याने ६३ हजार मीटर धागा वापरला , यासाठी त्याला २१ दिवस लागले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामधील नेरुर हा गाव, कलेचा अधिपती श्रीदेव कलेश्वर यांचे अधिष्ठान असलेला गाव. म्हणूनच की काय या गावामध्ये कला जोपासणारे गावकरी मोठ्या संख्येने पहावयास मिळतात. होळीच्या सणात या गावात मेस्त्री कुटुंबीय मोठमोठाले ऐतिहासीक चलत देखावे उभारून लोकांचे मनोरंजन करतात. “पारंपरिक होळीचा मांड” या नावाने हा सण पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. याच गावात हर्षद मेस्त्री हा अवलीया, उमदा तरुण अनेक कला जोपासतोय. यामध्ये दगडावर विविध चित्रे रेखाटणे, पिंपळाच्या पानावर अनेक मान्यवरांच्या छबी रेखाटणे, मोरपंखावर चित्र रंगवणे, तांदळाच्या दाण्यावर सूक्ष्म आणि नाजूक कलाकृती रेखाटने यासारख्या अनेक कलांमध्ये तो पारंगत आहे.
नुकतेच त्याने काळ्या रंगाच्या धाग्यापासून पंधरा बाय पंधरा फूट आकाराची शंकर पार्वतीची प्रतीमा बनवली. यासाठी त्याने त्रेसष्ठ हजार मीटर लांब धागा वापरला. अतिशय कलात्मक आणि तितकीच कठीण कलाकृती बनवीण्यासाठी त्याला एकवीस दिवस लागले. कुटुंबीय आणि मित्रमंडळींनी त्याला यासाठी मदत केल्याचे तो आवर्जून सांगतो.
अयोध्येमधील श्रीरामाची मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचा मुहूर्त साधून हर्षदने तीनशे चौतीस फूट उंचीची आणि दोनशे अठ्ठेचाळीस किलो प्लॅस्टिक वापरून श्रीरामाची भव्य प्रतिमाही त्याने साकारली. यासाठी नेरुर गावातील भव्यदिव्य शेतमळ्याचा त्याने वापर केला.संगीतातही तो पारंगत आहे. अनेक कार्यक्रमांमधून रसिकांनी त्याला भरभरून दाद दिली आहे.
ML/ML/SL
30 March 2024