पुणेकरांसाठी खुला झाला दुर्मिळ नाण्यांचा खजिना…

पुणे, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तीन हजार वर्षांपूर्वीपासूनची म्हणजे इ.स. पूर्व पाचशे वर्षांची नाणी , दुर्मिळ आणि प्राचीन नाण्यांची वैविध्यता. वेगवगेळ्या धातूंचे होन असा दुर्मिळ नाण्यांचा खजिना आज पुणेकरांसाठी खुला झाला. कर्वे रस्त्यावरील सोनल हॉल येथे इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटमस् यांच्यातर्फे आयोजित ‘कॉईनेक्स पुणे २०२३’ या विनामूल्य राष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन आज किशोर झुनझुनवाला यांच्या हस्ते झाले.
यावेळी व्यासपीठावर इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटमसचे संस्थापक बस्ती सोळंकी, अध्यक्ष किशोर चंडक, सहसचिव श्याम मोटे, सचिव शरद बोरा, निमंत्रक नितीन महेता आणि जीवनगैरव पुरस्काराचे मानकरी उपस्थित होते. यावेळी पुण्याचे प्रदीप सोहोनी, डॉ. अभिजित दांडेकर, मुंबईचे गिरीश जगशी वीरा, नागपूरचे डॉ. प्रशांत पी. कुलकर्णी, ठाण्याचे सुबोध एस. पेठे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना किशोर झुनझुनवाला म्हणाले की, ”कोणत्याही संग्राहकाचा संग्रह जितका दुर्मिळ होत जातो, तितका तो संग्राहक नम्र होत जातो. ही संग्राहकाची खरी ओळख आहे. संग्राहकांची पुढची पिढी निर्माण होणे आवश्यक असून यासाठी इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटमस् या संस्थेने प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन आणि कष्ट घेऊन ही पिढी घडवावी लागणार आहे.”
कर्वे रस्त्यावरील सोनल हॉलमध्ये आयोजित हे प्रदर्शन रविवार दिनांक २४ डिसेंबर २०२३ पर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटमस् तर्फे गेल्या २७ वर्षांपासून नाण्यांचे हे राष्ट्रीय प्रदर्शन आयोजित करण्यात येते. यंदा या प्रदर्शनाचे २८ वे वर्ष आहे. या प्रदर्शनात प्राचीन, मुघल, नजराणा,मराठा,एरर अशा दुर्मिळ आणि प्राचीन नाण्यांची वैविध्यता पुणेकरांना बघायला मिळते आहे.
या प्रदर्शनात सुवर्ण होन, चांदीचे होन, पितळाचे होन तसेच एन्शन्ट बीडस् आणि फॅन्सी कॉईन्स दाखविण्यात येणार आहेत. भारताचा इतिहास पाहता सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीपासून भारतात नाणी प्रचलित आहेत. अशी सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीपासूनची म्हणजे इ.स. पूर्व पाचशे वर्षांची नाणी या प्रदर्शनात बघायला मिळत आहेत. या प्रदर्शनात ४० फ्रेम्स लावण्यात आल्या आहेत. अतिशय दुर्मिळ अशा प्रकारचे संग्रह पुणेकरांना बघायला मिळत असून भारतातल्या विविध ठिकाणांहून हे संग्राहक या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. तसेच यानिमित्ताने प्रदर्शनात दुर्मिळ नाण्यांची खरेदी आणि विक्री करता येत आहे.
तुमच्याकडे उपलब्ध नाण्यांची ओळख करुन, त्याची अंदाजे किंमत, त्याचे वर्ष, इतिहास, त्यावरील अक्षरे, चित्र, ठसे याविषयीची माहिती नाणकशास्त्रातील तज्ज्ञांकडून जाणून घेता येत आहे. अतिशय दुर्मिळ आणि भव्य अशा या प्रदर्शनासाठी २४ तास सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बस्ती सोळंकी यांनी केले. नितीन मेहता यांनी आभार मानले.
या प्रदर्शनात शनिवार दिनांक २३ रोजी सकाळी ११.३० वाजता न्युमिस्मॅटिक विषयावर मार्गदर्शनपर व्याख्याने होणार आहेत. तर दुपारी ३.०० वाजेनंतर ओसवाल ऑक्शन होणार आहे. रविवार दिनांक २४ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजेपासून तोडीवाला ऑक्शन होणार आहे.
ML/KA/SL
22 Dec. 2023