या आंदोलनकर्त्या कुस्तीपट्टूंना एशियन गेम्ससाठी विशेष सूट
नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध आंदोलन करत आक्रमक भूमिका घेणारे बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट हे कुस्तीपट्टू चर्चेत आले होते. गृहमंत्र्यांनी लैंगिक शोषणाच्या आरोप झालेल्या बृजभूषण यांच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर या कुस्तीपटूंनी आपले आंदोलन स्थगित केले होते. दरम्यान सप्टेंबर महिन्यात चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्ससाठी बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांच्या समावेशाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता या दोघांनाही एशियन गेम्ससाठी थेट प्रवेश दिला जाईल. त्यांना ट्रायल्सला सामोरे जाण्याची गरज नाही.
भारतीय पदकविजेत्या कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्याविरूद्ध दोनवेळा जंतर मंतरवर आंदोलन केले. या आंदोलनाचे विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी केलं होतं. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केली असून हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे.
दरम्यान,बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जाची सुनावणी सुरू असून आज त्यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. यावेळी बृजभूषण शरण सिंह हे स्वतः न्यायालयात हजर होते. त्यांच्या नियमित जामीन अर्जावर आता 20 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
SL/KA/SL
18 July 2023