काश्मीर खोऱ्यात झालेल्या चकमकीत अकोल्याचा जवान शहीद

 काश्मीर खोऱ्यात झालेल्या चकमकीत अकोल्याचा जवान शहीद

श्रीनगर, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झालेत. त्यानंतर सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले .दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी कारवाई सुरू केली होती, त्यानंतर दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. या चकमकीत भारतीय सैन्य दलाचे दोन जवान शहीद झाले. यामध्ये महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील प्रवीण जंजाळ या जवानाचा समावेश आहे. प्रवीण जंजाळ शहीद झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या मोरगाव भाकरे या गावावर शोककळा पसरली आहे.

जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील फ्रिसल चिन्नीगाम भागात नाकाबंदी आणि शोधमोहीम सुरु असताना सैन्य दलाची दहशतावाद्यांशी चकमक झाली. यामध्ये भारतीय सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला.तर, दोन भारतीय जवानांना वीरमरण आलं. अजून चार दहशतवादी लपून बसल्याची शंका सुरक्षा दलांना आहे. या घटनेत अकोल्यातील एक जवान शहीद झाला आहे.

अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावातील प्रवीण प्रभाकर जंजाळ हे जवान शहीद झाले आहेत. प्रवीण जंजाळ शहीद झाल्याची माहिती गावापर्यंत पोहोचताच गावात शोककुल वातावरण पसरलं आहे. 2019 मध्ये प्रवीण जंजाळ हे भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते. त्यांच्या लग्नाला नुकतंच एक वर्ष झालं आहे. त्यांच्या मृत्यूच्या पश्चात पत्नी, आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.

सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत चार दहशतवाद्यांना मारण्यात आलं आहे. जिथं चकमक झाली तेथील ड्रोन फुटेजनुसार चार मृतदेह आढळन आले. गोळीबार सुरु असल्यानं ते मृतदेह ताब्यात घेण्यात आले नव्हते. चकमक सुरु असून काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक वी.के. बिरधी यांनी नाकाबंदी आणि शोधमोहीम सुरु राहील, असं म्हटलं. सुरक्षा दलांना दहशतवाद्यांचे मृतदेह आढळले आहेत. मात्र, चकमक अजून संपलेली नाही. बिरधी यांनी म्हटलं की जम्मू काश्मीर राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ चकमक झालेली नसून अंतर्गत भागात झालेली आहे.

SL/ML/SL

7 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *