जिल्हाधिकारी बंगल्यावर गोळी झाडून सुरक्षा रक्षकाने केली आत्महत्या
गडचिरोली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय “शिखरदीप” बंगल्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या राज्य राखीव दलाच्या जवानाने ड्युटी संपल्यावर बंगल्यातीलच विश्रामगृहात खाटेवर झोपून स्वतःच्या डोक्यात बंदुकीतून गोळी झाडून आज आत्महत्या केली आहे. उत्तम किसनराव श्रीरामे (३२) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव असून ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील रहिवासी आहेत.
मृत जवानाने आत्महत्येपूर्वी ‘ माणूस मरतो पण आत्मा अमर आहे’ असा स्टेटस व्हॉटस्अपला ठेवला असल्याची प्राथमिक माहिती असून श्रीरामे यांचा तीन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. राज्य राखीव दलाच्या पुणे येथील गट क्र. १ मध्ये ते कार्यरत असून ते गडचिरोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या शासकीय निवासस्थानी शिखरदीप बंगल्यात ते सुरक्षा रक्षक म्हणून सेवा देत होते. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी यांच्या बंगल्यावर ही घटना घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
ML/KA/SL
12 Feb. 2024