सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्याने दान केली आपली सर्व संपत्ती प्रभू राम चरणी

भोपाळ, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारमध्ये गृहसचिवपद भूषवलेले सेवानिवृत्त आयएएस अधिकारी एस. लक्ष्मी नारायणन हे त्यांची आयुष्यभराची कमाई श्रीरामाचरणी अर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. अयोध्येतील मंदीरात श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर त्याच्या मूर्तीसमोरच पाच कोटी रुपये खर्चून १५१ किलो वजनाचा रामचरितमानस हा ग्रंथ येथे स्थापित केला जाणार आहे.यासाठी लक्ष्मी नारायणन त्यांची आयुष्यभराची कमाई रुपये ५ कोटी खर्ची घालणार आहेत.
१० हजार ९०२ पदे असणाऱ्या या महाकाव्याचे प्रत्येक पान तांब्याचे असेल. प्रत्येक पानावर २४ कॅरेट सोन्याचा लेप असेल. त्यानंतर त्यावर सुवर्णाक्षरे कोरली जातील. यासाठी १४० किलो तांबे आणि पाच ते सात किलो सोन्याची आवश्यकता भासणार आहे. या ग्रंथासाठी नारायणन यांनी आपली सर्व संपत्ती विकण्याचा आणि बँक खाते रिकामी करण्याचा निर्णय घेतला आहे.ही एकूण रक्कम ५ कोटींच्या घरात असणार आहे. लक्ष्मीनारायणन यांनी रामचरितमानस ग्रंथाची जशी कल्पना केली आहे, तसे रूप वास्तवात आणण्याचा प्रयत्न देशातील सुप्रसिद्ध कंपनी वुम्मिदी बंगारू ज्वेलर्स करेल. या ज्वेलरी कंपनीने नव्या संसद भवनात स्थापित असलेल्या सेंगोलची निर्मिती केली आहे.
‘ईश्वराने मला आतापर्यंत बरेच काही दिले. मी प्रमुख पदे भूषवली. माझे आयुष्य चांगले चालू आहे. निवृत्तीनंतरही खूप पैसे मिळत आहेत. मी साधे भोजन करणारी व्यक्ती आहे. माझे निवृत्तीवेतनच खर्च होत नाही. ईश्वराने दिलेले खूप काही आहे आणि तेच त्याला परत करत आहे,’ अशी प्रतिक्रिया लक्ष्मीनारायण यांनी दिली आहे.
लक्ष्मीनारायण हे १९७०च्या आयएएस बॅचचे मध्य प्रदेश कॅडरचे अधिकारी होते. त्यांचा जन्म दिल्लीत झाला. सध्या ते दिल्लीतच राहातात. त्यांची पत्नी सरस्वती या गृहिणी आहेत. तर मुलगी प्रियदर्शनी अमेरिकेत वास्तव्याला आहे. त्यांचे वडील सुब्रमण्यम हेदेखील केंद्र सरकारमध्ये सचिव होते.
SL/KA/SL
22 Nov. 2023