कर्नाटकात स्पष्ट बहुमतासह काँग्रेसचा दणदणीत विजय
बंगळुरू, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांपैकी १३६ जागांवर विजय मिळवत काँग्रेस पक्षाला दणदणीत विजय मिळाला आहे. तब्बल २२ वर्षांनंतर काँग्रेसला कर्नाटकात इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. कर्नाटकात विजय खेचून आणण्यासाठी पंतप्रधान मोदींपासून ते अमित शहांपर्यंत सर्वांनाच प्रचाराला उतरवणाऱ्या भाजपला फक्त ६५ जागांवर विजय मिळवता आला आहे.
जनता दल सेक्युलर या पक्षाला १९ जागा मिळाल्या आहेत. दोन जागांवर अपक्ष आणि प्रत्येकी एका जागेवर कल्याण राज्य प्रगती पक्ष आणि सर्वोदय कर्नाटक पक्ष यांच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.
दरम्यान, पक्षनिहाय मतांची विभागणी पाहिल्यास यामध्ये काँग्रेसला ४२.९८ टक्के, भाजपला ३५.९१ टक्के तर जेडीएसला १३.३३ टक्के मतं मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसला ०.२७ टक्के आणि नोटाला ०.६९ टक्के मतं मिळाली आहेत.
काँग्रेसने कर्नाटक निवडणुकीत आक्रमकपद्धीने प्रचार केला. अनेक वर्षांनंतर सोनिया गांधी यांनी स्वतः विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना दिसल्या. कर्नाटकात त्यांनी रॅली काढली. राहुल गांधी, प्रियांका गांधीही कर्नाटकात होते. राहुल गांधींनी 11 दिवसात 23 रॅली आणि 2 रोड शो केले. तर प्रियांका गांधी यांनी ९ दिवसात १५ रॅली आणि ११ रोड शो केले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या गृहराज्यात १५ दिवसांत ३२ रॅली आणि रोड शो केले. याचा परिणाम निकालात दिसला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून कर्नाटकातील विजयाबद्दल काँग्रेस पक्षाचे अभिनंदन केले आहे.
SL/KA/SL
13 May 2023