भर उन्हात फुलला दुर्मीळ पिवळा पळस; संवर्धनाची मागणी

वाशीम दि २८:– वाशीम जिल्ह्यातील वनोजा समृद्धी इंटरचेंज परिसरातील शेतशेशिवारात दुर्मीळ असा पिवळ्या रंगाचा पळस फुलला असून, त्याचे सौंदर्य प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे. सहसा लालसर केशरी रंगात आढळणाऱ्या पळसाच्या झाडांची ही दुर्मीळ प्रजाती असून, पर्यावरण प्रेमी आणि वनस्पती अभ्यासकांसाठी ही मोठी पर्वणी ठरली आहे.
वनस्पतीशास्त्रज्ञांच्या मते, पळस (Butea monosperma) हा सामान्यतः लालसर केशरी रंगाच्या फुलांनी बहरणारा वृक्ष असतो. मात्र, काही दुर्मीळ प्रकारांमध्ये या फुलांना पिवळा रंग येतो. हा बदल जनुकीय फरकांमुळे किंवा विशिष्ट मातीच्या प्रकारामुळे होतो, असे अभ्यासक सांगतात.
काटेपूर्णा अभयारण्याच्या जवळ असल्याने या परिसरातील जैवविविधतेसाठी हा वृक्ष महत्त्वाचा ठरू शकतो. निसर्गप्रेमी आणि स्थानिक पर्यावरणसंरक्षक यांनी या वृक्षाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे. अनेक वेळा अशा दुर्मीळ प्रजाती अज्ञानामुळे दुर्लक्षित राहतात, त्यांची तोड केली जाते किंवा शहरीकरणाच्या प्रभावामुळे नष्ट होतात. त्यामुळे स्थानिक प्रशासन, वनविभाग आणि पर्यावरण प्रेमींनी एकत्र येऊन या दुर्मीळ पिवळ्या पळसाचे संवर्धन करावे, अशी मागणी होत आहे.
या दुर्मीळ प्रजातीचे संवर्धन आणि संशोधन केल्यास स्थानिक जैवविविधता वाढण्यास मदत होईल, तसेच भविष्यात वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरेल. त्यामुळे प्रशासनाने या झाडांची नोंद घेऊन त्याच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही पर्यावरण अभ्यासक सुचवत आहेत.