दुर्मिळ सारस पक्षी आढळले मामा तलावांवर
भंडारा, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दुर्मिळ सारस पक्षी लुप्त होण्याचे मार्गावर असताना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील बिनाखी येथील मामा तलावावर तीन सारस पक्ष्यांचे आता नियमित दर्शन होत आहे. सारसांचा मुक्त संचार असून, पक्षीमित्र येथे निरीक्षणासाठी गर्दी करून आहेत.
विशेष म्हणजे बिनाखी गावांच्या शिवारात तलावावर अनेक वर्षापासून दोन सारस पक्ष्यांच्या जोडी दिसून येते त्यात पुन्हा एक सारस पक्ष्याची भर पडली आहे. भंडारा जिल्ह्यात नोंद असलेले तिन्ही सारस बिनाखीतच असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान कृषी, पंचायत, महसूल आणि वन विभागाच्या संयुक्त बैठकीत बिनाखी शिवारातील शेतीत रासायनिक खतांच्या उपयोगावरबंदी घालण्यात आली आहे. सारस पक्ष्यांना नुकसानदायक अशा खतांचा वापर करण्यात येऊ नये, असे शेतकऱ्यांना निर्देशित करण्यात आले आहे.
या तिन्ही सारस पक्ष्यांच्या हालचालींवर सारसमित्र नियंत्रण ठेवून आहेत. महाराष्ट्रामध्ये भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यात केवळ बोटावर मोजण्याइतके सारस पक्षी उरले आहेत, त्यामुळे या सारस पक्षांचे संवर्धन करण्याचे कार्य शासन स्तरावर सुरू आहे.
ML/KA/SL
11 Jan. 2023