आर्थिक क्रांतीकडे टाकलेले सक्षम पाऊल

पिंपरी प्रतिनिधी, दि. २ : ‘एक देश एक कर’ या संकल्पने अंतर्गत देशपातळीवर वस्तू व सेवा कर (जीएसटी) २०१७ सालापासून आकारण्यास सुरुवात झाली. हे आर्थिक क्रांतीकडे टाकलेले सक्षम पाऊल आहे. यामुळे कर चोरी, कर बुडवणे यावर नियंत्रण मिळवता येईल आणि भारत एक आर्थिक सक्षम देश म्हणून पुढे जाईल असा विश्वास हैदराबाद येथील केंद्रीय कर आयुक्त सुरेंद्रकुमार मानकोसर यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पुणे बिजनेस स्कूल (पीबीएस) आकुर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मानकोसर पुढे म्हणाले की, जुन्या कर सेवा प्रणालीमध्ये बदल होऊन अनेक प्रकारच्या जटिल, अप्रत्यक्ष करांची जागा जीएसटी ने घेतली. त्यामुळे केंद्रीय व राज्य पातळीवर आकारल्या जाणाऱ्या विविध प्रकारचे कर रद्द होऊन जीएसटी करामध्ये सुसूत्रता आली. ही प्रणाली म्हणजे नुसते कर आकारणी नसून, त्यामुळे व्यवसायिकांना, उद्योजकांना सुलभता निर्माण करून कर भरण्यास प्रोत्साहन देण्यात आले. यामुळे उद्योग व्यवसायाला, रोजगार निर्मितीला चालना मिळाली. केंद्र आणि राज्य यांच्यामधील परस्पर सहकार्य वृद्धिंगत होऊन कर प्रणालीचे पालन करणे आता सर्वांना सुलभ झाले आहे.
पुणे बिजनेस स्कूलच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी त्यागी यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, जीएसटी कर प्रणाली ही भारताच्या आर्थिक व उद्योग वाढीसाठी केंद्रस्थानी आहे. यामध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून विद्यार्थ्यांना याविषयी आवश्यक ती माहिती देण्यासाठी पीबीएस मध्ये अशा प्रकारचे मार्गदर्शन चर्चासत्र नेहमी आयोजित करण्यात येतात.
पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष काम करणे व त्याची अंमलबजावणी करणाऱ्या व्यक्तींना येणारे अनुभव व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळते. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीबीएस संचालक डॉ. गणेश राव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वागत अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी त्यागी, सूत्र संचालन प्रा. नताश दुबे, आभार प्रा. विभूती दुबे यांनी मानले.