एन.डी.स्टुडिओतील सहलीत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी लुटला आनंद
मुंबई दि १४ : कर्जत येथील एन. डी. स्टुडिओत जिल्हा परिषदेच्या काकडवाल शाळेतील विद्यार्थ्यांची सहल आयोजित करण्यात आली होती. या सहलीत चित्रपटात पाहिलेले भव्य देखाव्यांचे सेट प्रत्यक्षात अनुभवताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहावयास मिळाला.
प्रसिद्ध कलादिग्दर्शक दिवंगत नितीन देसाई यांनी कर्जत-खालापूर येथे एन. डी. स्टुडिओ उभारला आहे. या स्टुडिओचा ताबा आता महाराष्ट्र शासनाने घेतला असून, स्टुडिओचे व्यवस्थापन सांस्कृतिक विभागाचे गोरेगाव येथील `दादासाहेब फाळके चित्रनगरी’कडून केले जाते.
चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल जोगळेकर यांच्या नेतृत्वाखाली एन.डी.
स्टुडिओमध्ये विविध उपक्रम सुरू आहेत. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना चित्रपटाची निर्मिती, चित्रीकरण आणि स्टुडिओ पाहता यावा, यासाठी एक दिवसांच्या सहली आयोजित केल्या जात आहेत.
त्यानुसार ठाणे जिल्हा परिषदेच्या काकडवाल शाळेतील विद्यार्थी व शिक्षक अशा १०३ विद्यार्थ्यांनी एन. डी. स्टुडिओला भेट दिली.
विंटेज कारने विद्यार्थ्यांनी स्टुडिओची सफर केली. यावेळी विविध चित्रपटांचे स्टुडिओत झालेले चित्रीकरण, त्यावेळी वापरलेला सेट यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
एन डी स्टुडिओतील सहलीचा नाविन्यपूर्ण अनुभव
एन. डी. स्टुडिओतील एक दिवसाच्या सहलीने विद्यार्थ्यांना चित्रपट
निर्मितीमागील घटक, स्टुडिओची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांच्या जीवनात ही सहल नाविन्यपूर्ण ठरेल, अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केली.