ठाणे खाडीत मूर्ती विसर्जनावरून उद्भवला नवा पेच

 ठाणे खाडीत मूर्ती विसर्जनावरून उद्भवला नवा पेच

ठाणे, दि.२८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गणरायाच्या विसर्जनाला काही तास उरलेले असताना प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तींच्या ठाणे खाडीपात्रात थेट विसर्जनाच्या मुद्द्यावरून ठाणे महापालिकेसमोर नवा पेच उभा राहिला आहे. राष्ट्रीय हरीत लवादाने पी ओ पी मूर्ती तिथे विसर्जन न करण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्रीय प्रदूषण मंडळाची विसर्जन नियमावली – २०२० मधील सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश ठाणे महापालिकेला लवादाने दिले आहेत. तसेच, महाराष्ट्र प्रदूषण मंडळानेही ठामपा याबाबतीत काय कार्यवाही करते याकडे लक्ष ठेऊन दोन आठवड्यात अनुपालन अहवाल सादर करण्यास सांगितल्याने यावर प्रशासन तातडीने काय प्रभावी उपाययोजना करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

तलावांचे शहर असलेल्या ठाण्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. वर्षागणिक घरगुती आणि सार्वजनिक गणेश मूर्तींच्या विक्रीमध्ये वाढ होताना दिसते आहे. यंदाच्या वर्षी पोलीस आयुक्तालयाच्या अहवालानुसार ठाणे शहरात सुमारे ४१ हजार घरगुती तर साडेतीनशेच्या वर सार्वजनिक गणेश मूर्तींची स्थापना झाली आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात दीड लाखांपेक्षा जास्त गणेशमूर्तींची स्थापना झाली आहे.

आजमितीला शहरात ३५ तलाव अस्तित्वात आहेत. यातील अनेक तलावांना अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. तर सांडपाणी आणि इतर प्रदूषणामुळे हे तलाव शेवटची घटका मोजत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळते. या तलावांचे गणेशोत्सवा
दरम्यान होणाऱ्या अधिकच्या प्रदूषणापासून संरक्षण व्हावे, याकरीता २०१५ सालापासून नागरिकांच्या सुविधेसाठी गणेश विसर्जना दरम्यान कृत्रिम तलाव तसेच निर्माल्य कलश उभारून गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात येते.

ठाण्यातील पर्यावरण कार्यकर्ते, पाणथळ समिती सदस्य रोहित जोशी यांनी माहिती अधिकाराखाली ठाणे महापालिकेकडून गणेशोत्सवादरम्यान केल्या जाणाऱ्या सर्व प्रक्रियांची माहिती घेतली. याही वर्षी ४२ कृत्रिम तलाव विविध ठिकाणी तयार करण्यात आले आहेत. एका कृत्रिम तलावासाठी तब्बल ११ लाख रुपये याप्रमाणे करोडो रुपयांचा खर्च दरवर्षी ठाणे महापालिका कृत्रिम तलावांवर करते हे माहितीच्या अधिकारात समोर आले आहे. विविध उपक्रमांद्वारे नागरिक महापालिकेच्या पर्यावरण संवर्धनाच्या आवाहनाला लक्षणीय प्रतिसाद देत आहेत.मात्र मुख्य हेतू सफल होताना दिसत नसल्याने तसेच
२०१९ पासून यावर सातत्त्याने पाठपुरावा करून, महापालिका अधिकाऱ्यांची सातत्याने चर्चा करून देखील या प्रक्रियेत कोणताही अपेक्षित बदल घडून येत नसल्याने सरतेशेवटी रोहीत जोशी यांनी राष्ट्रीय हरित लवादात या अनागोंदी कारभाराविरुद्ध दाद मागितली.

त्यावर २६ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय हरित लवाद, दक्षिण विभाग, पुणे येथे सुनावणी पार पडली. या सर्व प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तसेच गणेश चतुर्दशीला अवघ्या काही तासांचा अवधी बाकी असल्याने राष्ट्रीय हरित लवादाने यामध्ये तातडीने लक्ष घालून ठाणे महापालिकेच्या कार्यशैलीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत यापुढे कोणत्याही नैसर्गिक अथवा कृत्रिम स्त्रोतामध्ये हा मलबा मिसळता येणार नाही, याची जबाबदारी ठामपाची असेल अशी सक्त ताकीद दिली. पर्यावरण संरक्षण कायदा तसेच केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या २०२० सालच्या मूर्ती विसर्जनाबाबत मार्गदर्शक नियमावलीचे कठोरपणे पालन करण्यात यावे. असे आदेश महापालिकेला दिले.

या आदेशांचे पालन महापालिका कसे करते यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी न्यायालयाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर सोपविली आहे. तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.

ML/KA/SL

28 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *