९१६ विद्यार्थ्यांच्या जीवनात `विद्यादान’मुळे उगवली नवी पहाट!
ठाणे दि १३(एमएमसी न्यूज नेटवर्क) : गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी कार्यरत असलेल्या ठाण्यातील विद्यादान सहायक मंडळामुळे आतापर्यंत ९१६ तरुण-तरुणींच्या जीवनात नवी पहाट उगवली आहे. `सक्षम विद्यार्थी, सक्षम राष्ट्र’ ब्रीदवाक्य असलेल्या या मंडळाचा वर्धापनदिन ठाण्यातील सीकेपी हॉलमध्ये नुकताच उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमात तरुणांनी कृतज्ञतेच्या भावना व्यक्त करीत सक्षम राष्ट्रासाठी कार्य करण्याचा निर्धारही व्यक्त केला.
सुरुवातीला विद्यादान मंडळाचे संस्थापक दिवंगत भाऊ निनावडेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आदरणीय भाऊंच्या स्मृतींना वंदन करण्यात आले. विश्वस्त वर्षा जोशी यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. त्यावेळी यंदाच्या २०२३-२४ या आर्थिक वर्षात १३५ होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात आला असल्याचे जाहीर करण्यात आले. गेल्या १६ वर्षात ९१६ तरुण-तरुणींच्या भविष्याला आकार देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या विद्यार्थ्यांपैकी डॉ. श्रद्धा जाधव, स्वप्निल हिंदळकर, सचिन शेलावले आणि सनी नवरत या विद्यार्थ्यांनी आपला प्रवास तसेच संघर्ष उपस्थितांसमोर मांडला. त्यावेळी सर्वांची मने गहिवरून आली होती. अन्, नकळत सर्वांनी विद्यादानच्या कार्याला मनोमन सलाम ठोकला.
विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा प्रवास अखंड सुरू राहील, असा विश्वास गीता शहा यांनी व्यक्त केला. या वेळी धनश्री अभ्यंकर यांच्यासह सहकाऱ्यांनी व्हय मी सावित्री बोलतेयं' या लघुनाट्याचा प्रयोग सादर केला. तर विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड तसेच भीती नाहिशी करून त्यांच्यात आत्मविश्वास जागृत करणाऱ्या
बी फ्रॅंक’ या कार्यक्रमाबद्दल करण परदेशी यांनी माहिती दिली.
तसेच गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत करियर गाईडन्स टीममध्ये ट्रेनिंग न व्हर्टनरी मेडिसीन शाखांचा समावेश करण्यात आला. या शाखांमधील गुणवंत पोलिस शिपाई निकिता घरत , रोशन देऊर मल्ले यांनीही मनोगत व्यक्त केले. निलेशकुमार यादव तथा क्षितिज नांगरे यांनी वेळेच्या व्यवस्थापनावर सादरीकरण केले. तर मंडळाच्या निर्माण तसेच सेवांकूर शिबिरातील विविध अनुभव प्रतीक्षा मोकाशी आणि अर्जुन टोपीवाला यांनी मांडले.
या कार्यक्रमात कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना जयेश्री मोकाशी पुरस्कार , वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा धन्वंतरी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेसाठी आवश्यक निधी जमा करण्यासाठी गणेशोत्सवात डोनेशन बॉक्स ठेवले जातात. या उपक्रमाची माहिती प्रथमेश नवलेकर याने दिली. आकाश पवार, आदिती तांटक यांनी सूत्रसंचालन, तर माधवी मुळे यांनी आभार मानले.
ML/ML/SL
13 August 2024