ब्रिटनमधील विद्यापीठात लागला नवीन रक्तगटाचा शोध

 ब्रिटनमधील विद्यापीठात लागला नवीन रक्तगटाचा शोध

लंडन, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ब्रिटनमधील ‘एनएचएस ब्लड अँड ट्रान्सप्लांट’ अर्थात एनएचएसबीटी आणि ब्रिस्टॉल विद्यापीठातील संशोधकांनी एक नवीन रक्तगट शोधून काढला आहे. या रक्तगटाला त्यांनी MAL म्हणजेच ‘माल’ असे नाव दिले आहे.या शोधामुळे सुमारे पन्नास वर्षांपूर्वी ‘ANWJ’ या रक्तगट अँटिजेनभोवती निर्माण झालेले गूढ उकलले आहे.या नव्या संशोधनामुळे अनेक जणांचे प्राण वाचविण्यात मदत होईल,असा विश्‍वासही या संशोधकांनी व्यक्त केला आहे.हे संशोधन तब्बल २० वर्षे चालले होते.

लुईस टिली यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या पथकाने हे संशोधन केले आहे.१९७२ मध्ये ‘एएनडब्लूजे’ या रक्तगटाचा अँटिजेन सापडल्यानंतरही त्याच्या जनुकीय पार्श्वभूमीचा शोध लागत नव्हता. हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक नवीन चाचणी शोधून काढली.प्रत्येकाच्या शरीरात असे अँटिजेन असतात,पण कधी कधी त्यांची संख्या कमी असू शकते. ‘एनएचएसबीटी’ने जनुकीय चाचणीचा आधार घेत रुग्णांमधील हे कमी असलेले अँटिजेन शोधून काढण्याची नवी चाचणी तयार केली. हा रक्तगट अत्यंत दुर्मिळ असला तरी अशा लोकांना आजार झाल्यास त्यांच्यावर उपचार करणे सोपे जाणार आहे. जगभरात वर्षाला किमान चारशे लोकांना तरी या नव्या चाचणीमुळे फायदा होईल,असा अंदाज लुईस टिली यांनी व्यक्त केला आहे.

SL/ML/SL

19 Sept 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *