घमेंडीयाची बैठक म्हणजे डरपोकांचा मेळावा

 घमेंडीयाची बैठक म्हणजे डरपोकांचा मेळावा

मुंबई,दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : घमेंडिया नावाने गोळा झालेल्या 28 पक्षांना आमचा सवाल आहे की, तुम्ही लोकशाही वाचवायला एकत्र आला की, स्वतःचे कुटुंब वाचवायला एकत्र आला आहात? माझे कुटुंब माझी जबाबदारी याचा राष्ट्रीय खेळ सुरू आहे का? ज्या मुंबईतून “क्विट इंडिया” मोहीम सुरू झाली त्या मुंबईकरांच्या वतीने आम्ही तुम्हाला “चले जाव…” म्हणत आहोत. घमेंडीया म्हणजे डरपोकांचा मेळावा असून हा पोरखेळ सुरु आहे, अशा शब्दात मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी इंडिया आघाडीवर टीका केली आहे.

आ शेलार यांनी प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले की, आज पत्रकार परिषद घेण्याची वेळ येते हे दुर्दैव बाब आहे. मुंबई आणि महाराष्ट्र आज जो डरपोकांचा खेळ पाहतो आहे त्यावर नक्कीच चिंतन करून महाराष्ट्र स्वधर्म, स्वराज्य आणि आत्मनिर्भर भूमिकेच्या बाजूने उभा राहील याबद्दल आमच्या मनात शंका नाही.
घमंडी या नावाने आज जो काही 28 पक्षांचा पोरखेळ चालू आहे. हा डरपोकांचा मेळावा आहे. आम्ही यांना डरपोक यासाठी म्हणतो की, यांच्यापैकी कोणीही एक पक्ष भारतीय जनता पक्षाचा एकट्याने सामना करू शकत नाही. भारतीय जनता पक्षाने सेवेचे जे जाळे विणले आहे त्या विरोधात ब्र काढण्याची एकाचीही हिम्मतही नाही. पोरखेळ यासाठी म्हणतो आहे की, उबाठा नेते उद्धवजी यांचे वाक्य म्हणजे देशासमोर होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका या काही बालिशपणा आणि पोरखेळ वाटावा अशा पद्धतीचे आहे.

आमच्याकडे म्हणे बरेच पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत, तुमच्याकडे एकच आहे. देश असा चालतो का? लोकशाहीमध्ये अशी व्यवस्था असते का ?
जनतेला पहिल्या दिवसापासून भ्रमित करायचे याची सार्वजनिक कबुली दिली जाते आहे. आम्ही पंतप्रधानपदी एक उमेदवार देऊ शकत नाही याची मान्यता देऊन निवडणुकीला समोरे जाता येते का? घरात बसून राजकारणाची सवय झाल्यामुळे वतनदारी आणि सरंजामशाही सारखी प्रत्येक विभागाला वेगळा पंतप्रधान ही कल्पना त्यांची आहे का? जगाचे नेतृत्व करायला निघालेला भारत देश त्या देशाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी बद्दल इतके बालिश वक्तव्य केले जाते म्हणूनच हा पोरखेळ आहे, असे आमचे मत आहे.

आज जमलेत ती मंडळी कोण आहेत, याचे उत्तर उद्धवजींनी द्यावे. आयुष्यभर ज्यांनी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा द्वेष केला. ती सगळी मंडळी एकत्र करून त्यांची पत्रावळी तुम्ही उचलत आहात. ज्यांनी लिखित आणि डझनवारी वेळा बोलून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा बदनामी आणि अपमान केला ती मंडळी येतायत त्यांची पत्रावळी उबाठाचे सैनिक उचलत आहेत. ही सगळी महाराष्ट्रात द्वेषी मंडळी एकत्र येत आहेत. त्यांच्या पत्रावळी उचलण्याचे काम पवार साहेबांचा आणि उद्धवजींचा पक्ष करत आहे.
किमान जनाची नाही मनाची तरी आहे का? एवढेच मी या ठिकाणी म्हणेन असे शेलार म्हणाले..

आम्ही लोकशाही वाचवायला निघालो;आम्ही हुकुमशाहीच्या विरोधात आहे असे आवरण केले जात आहे. या सगळ्यांच्या बाबतीत जनतेच्या मनात सवाल आहे. 28 पक्षांना सवाल आहे की, तुम्ही लोकशाही वाचवायला एकत्र आला की स्वतःचे कुटुंब वाचवायला एकत्र आलात? माझे कुटुंब, माझी जबाबदारी याचा राष्ट्रीय खेळ आहे का? सोनियाजींना राहुलजींची चिंता, उद्धवजींना आदित्यजींची चिंता, लालू यादवला तेजस्वी यादव यांची चिंता आणि त्यामुळे ही सगळी मंडळी देश लोकशाहीचा विषय नाही. कुटुंब अन् माझ्यानंतर पुत्र पुत्री याला वाचवण्यासाठी खेळ करत आहेत. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी आणि मोदीजी 140 कोटी जनतेचा विचार करत आहे. या देशात पहिल्यांदा असे चित्र आहे की जो तथाकथित राष्ट्रीय पक्ष आहे. मी राष्ट्रीय काँग्रेसला म्हणतो आहे. तो बऱ्याच राज्यात नाहीये. तरीही मान्यता आहे म्हणून..तो प्रादेशिक पक्षासमोर झुकतो आहे. आमचा सवाल आहे 28 पक्षांना तुमचा नेता कोण ? तुमचा समन्वयक कोण? तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण? याचे उत्तर त्यांनी थेट द्यावे.

भारतीय जनता पार्टीने आपली तयारी संपूर्ण देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सुरू केली आहे. महाराष्ट्रात आम्ही 45 प्लस टार्गेट देऊन लोकसभेच्या जागांच्या कामासाठी आम्ही लागलो आहोत. आमचा समन्वय सर्व पक्षांमध्ये आहे. पण ही जी काही मंडळी जमली आहे त्यांना आम्ही प्रश्न विचारतो या 28 पक्षांना की तुमच्या एवढा मुंबई विरोधी भूमिका घेतलेले अन्य पक्ष कुठले नाहीत. त्यामुळे मुंबई तर तुम्हाला चले जाव करत आहेत. ज्या मुंबईतून क्विट इंडिया मोहीम सुरू झाली त्या मुंबईकरांच्या वतीने आम्ही तुम्हाला चले जाव म्हणत आहोत. कारण या 28 पक्षांमध्ये अशी मंडळी आहेत २६ / ११ ला मुंबईत हल्ला झाला कराचीत जो कट शिजला, शेकडो लोकांचे बळी प्राण आणि विकलांग करून गेला त्या देशावरच्या हल्ल्याची संपूर्ण इंटेलिजन्स रिपोर्ट हा तात्कालीन यूपीए सरकारला होता तरीही मुंबईवर हल्ला झाला. ही मंडळी मुंबईत आली ती या पार्श्वभूमीची आहेत.

२६ / ११ हल्ल्यानंतर भारताच्या संसदेत जी चर्चा झाली त्यावेळीला या हल्ल्यामागे हिंदू शक्ती होत्या असे म्हणणारे पक्ष तुमच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत याचे उत्तर उद्धवजी आणि उबाठा देणार आहेत का? केवळ २६ / ११ नाही, तर ९३ मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले, मुंबईवर हल्ला केला त्यावेळेस सुद्धा केवळ विशिष्ट वर्गाची मतं आणि लांगुलचालन यासाठी ज्या नेत्याने मुंबईतील मुस्लिम भागांमध्ये एक काल्पनिक बॉम्बस्फोट होता, असं सांगितलं तो नेता आणि ती मंडळी २८ पक्षांमध्ये आहेत. उद्धवजी तुमची याच्याबद्दलची भूमिका काय?

बालाकोटच्या हल्ल्यानंतर जो एअर स्ट्राइक केला त्याचे पुरावे मागणारी ही मंडळी त्या २८ पक्षांमध्ये आहेत. उद्धवजी तुम्ही तर त्याही वेळेला शंका घेतली होती. इंडिया हे नाव वापरण्यासाठी २८ पक्ष लायक आहेत का ? याचे उत्तर उद्धवजी तुम्ही द्यावे? सावरकरांचा अपमान बदनामी पुढे जाऊन सच्चर समितीचा अहवाल पूर्णपणे त्याची अंमलबजावणी आम्ही करू आणि यूपीएचे नेते म्हणाले भारतातल्या नैसर्गिक साधनांवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे, याबद्दल उद्धवजी तुमची भूमिका काय आहे? हे जनतेसमोर स्पष्ट करा. ३७० कलमाला विरोध करणाऱ्या मेहबूबा काश्मीरमधील अन्य पक्ष यांच्याशी तुम्ही मांडी लावता याबद्दल उद्धवजी तुमची भूमिका स्पष्ट करा. मुंबईकराच्या वतीने आम्ही तुम्हाला “चले जाव…” म्हणतो आहोत. डरपोक पोरखेळांचा हा मेळावा मुंबई विरोधी, महाराष्ट्र विरोधी आणि देश विरोधी लोकांचा आहे हे आमचं म्हणणं स्पष्ट आहे असे आशीष शेलार म्हणाले.

राऊत तर सरपंच पदाची निवडणुकही लढले नाहीत
भारत तो जितेगा लेकिन यूपीए २ हारेगा संजय राऊत यांनी साधी सरपंच पदाची निवडणूक लढली नाही त्यांनी निवडणुकीवर न बोललेले बरे… राहुल गांधींच्या पायातील चपला उचलण्याचे काम उबाठाचे सैनिक करत आहेत. हे दुर्दैव आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने यावर तीव्र आंदोलन केले जाणार आहे. त्यावर प्रश्न उपस्थित केले जातील. सावरकरांच्या बदनामीचा आक्रोश केला जाईल. राहुल गांधींच्या बाबतीत सुद्धा आक्रमक विरोध आम्ही करू.. सावरकरांची बदनामी करणाऱ्या तीन पातळीवर जाणाऱ्या राहुल गांधींच्या पायघड्या आणि पायातले जोडे उचलण्याचे काम उबाठा करत आहे त्याचाही निषेध होईल. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या विषयी बोलताना ते म्हणाले आदित्यजी तुमचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून आम्ही आंदोलन करत आहोत जेव्हा तुम्ही गादी ओली करत होता तेव्हा आमच्या लोकांनी बलिदान दिले आहे. त्यामुळे तुम्ही प्रश्न न विचारलेला बरा असा टोला आशीष शेलार यांनी यावेळी लगावला.

ML/KA/SL

31 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *