आरोग्यवर्धक मॉरिशयन काळ्या ऊसाने फुलली बाजारपेठ

वाशिम, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळी निमित्त वाशिमच्या बाजारपेठेत मॉरिशयन काळा ऊस विक्रीसाठी आला असून सणासुदीच्या काळात पूजेसाठी काळ्या ऊसाला प्रचंड मागणी असते. वाशिम जवळील काटा या गावात मॉरिशियन काळ्या ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात असून काटेपूर्णा आणि पुस नदीच्या पात्रात वसलेले काटा हे गाव महाराष्ट्रात काळ्या ऊसाच्या लागवडीसाठी प्रसिध्द आहे.
गावाच्या उत्तरेला टेकडीवर वसलेले चांदाई माता मंदीर तर गावाच्या पश्चिमेला शिवशक्ती मातेचे अधिष्ठान आहे. काटेपूर्णा आणि पुस या दोन नद्यांचे उगमस्थान असलेले काटा हे गाव विकसित शेती बरोबरच तीर्थ आणि पुरातन बाबींसाठी प्रसिध्द आहे. मात्र, या गावात उत्पादन घेत असलेल्या काळ्या ऊसाची सर्वत्र चर्चा आहे.
१८ व्या शतकात मुंबईचे शिल्पकार म्हणून ख्याती असलेले जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांनी खास मॉरिशस या बेटातून काळ्या ऊसाचे वाण भारतात आणले होते. कालांतराने तेच वाण वाशिम जिल्ह्यातील काटा या गावातील तत्कालीन शेतकऱ्यांनी मिळवून ऊस शेती करायला सुरूवात केली असे येथील स्थानिक शेतकरी सांगतात.
एरवी साखरेसाठी कारखान्यात आणि रसवंतीवर वापरल्या जाणाऱ्या पांढऱ्या ऊसाला हमीभाव मिळत नाहीत. मात्र सणासुदीच्या काळात पूजेसाठी तसेच आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असलेल्या काट्याच्या या काळया ऊसाला महाराष्ट्र राज्यासह शेजारील मध्यप्रदेश, तेलंगणा , गुजरात या राज्यातही मागणी आहे. आज घडीला काटा या गावांत शेकडो एकर क्षेत्रावर काळया ऊसाची लागवड होते.
दरम्यान, दिवाळीनिमित्त वाशिम शहरातील मुख्य चौकात काळा ऊस विक्रीसाठी आला असून या ऊसामुळे हजारो कष्टकरी शेतकऱ्यांचे जीवन आनंदी आणि समृध्द झाले आहे.
ML/KA/SL
11 Nov. 2023