राज्याच्या उच्च शिक्षणात होणार मोठा बदल, MahaSARC ची स्थापना
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून निर्णयांचा सपाटा लावला जात आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाबाबत विविध निर्णय घेतले जात असताना आता राज्याच्या उच्च शिक्षणातही मोठे बदल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्रेडिट्स एक विद्यापीठातून दुसऱ्या विद्यापीठात सहज हस्तांतरित करता यावेत यासाठी ‘महाराष्ट्र राज्य शैक्षणिक आणि संशोधन परिषद’ (MahaSARC) नावाचे एक नवे सल्लागार मंडळ स्थापन केले जाणार आहे.
हे मंडळ राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क अंतर्गत शैक्षणिक क्रेडिट ट्रान्सफरसाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे तयार करणार आहे. यामुळे विविध विद्यापीठांमधील अभ्यासक्रमांमध्ये शैक्षणिक समानता निर्माण होईल आणि विद्यार्थ्यांना अधिक लवचिकता मिळेल.
MahaSARC च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार सर्व शासकीय सार्वजनिक विद्यापीठांसाठी एकसंध अभ्यासक्रम आराखडा आणि शैक्षणिक कॅलेंडर तयार करणार आहे. ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी गुणवत्ता मानके, मूल्यांकन प्रणाली, आणि NCrF स्तरांसह धोरणात्मक आराखडा देखील हे मंडळ तयार करेल.
सरकारने आधीच NEP अंतर्गत नवीन अभ्यासक्रमांना मान्यता देताना एक मार्गदर्शक क्रेडिट फ्रेमवर्क अधिसूचित केला आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून हे मंडळ आता राज्यभरात क्रियाशील होणार आहे.