कंबोडियामधील हिंदू मंदिर ठरले जगातील आठवे आश्चर्य

नोम पेन्ह, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दक्षिण आशियाई देश कंबोडियामधील ‘अंगकोर वाट’ हे मंदिर आता ८ वे आश्चर्य म्हणून ओळखले जाणार आहे. विशेष म्हणजे सर्वात मोठी धार्मिक रचना म्हणून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये त्याची नोंद आहे. या मंदिराने इटलीच्या पॉम्पेईला मागे टाकत जगातील ८ वे आश्चर्य होण्याचा मान मिळविला आहे.अंगकोर वाट हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ देखील आहे.अंगकोर वाट हे जगप्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. मूलतः हे मंदिर भगवान विष्णूंचे असून इसवी सनाच्या १२ व्या शतकात उत्तर कंबोडियामध्ये सूर्यवर्मन दुसरा या राजाच्या कालखंडात बांधण्यात आले होते.
कंबोडियातील अंगकोर वाट हे जगातील सर्वात मोठे धार्मिक स्मारक आहे. हे एक विशाल मंदिर संकुल आणि युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. या मंदिरामुळेच भारत आणि कंबोडिया यांच्यामधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक बंध समजण्यास मदत होते. नंतरच्या काळात हा मंदिर परिसर बौद्ध धर्मियांच्या प्रभावाखाली गेल्याने हे स्थळ बौद्ध धार्मियांसाठी देखील तितकेच महत्त्वाचे ठरले. एकूणात हे मंदिर ४०० एकरहून अधिक परिसरावर पसरलेले आहे, म्हणूनच जगातील सर्वात मोठ्या धार्मिक स्थळांमध्ये या मंदिराचे स्थान विशेष मानले जाते.
अंगकोर वाट याचा अर्थ स्थानिक ख्मेर भाषेत “मंदिराचे शहर” असा होतो. १९७० च्या दशकात ख्मेर रूज राजवटीत आणि पूर्वीच्या प्रादेशिक संघर्षांमध्ये या मंदिराचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे या मंदिरात सद्य:स्थितीत कोणतेही कोणतेही धार्मिक विधी होत नाहीत. असे असले तरी कंबोडियामधील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते.
अनेक ऐतिहासिक स्थळांप्रमाणे हे मंदिर देखील विस्मरणात गेले होते. १८४० साली फ्रेंच प्रवासी हेन्री मौहॉट यांनी केलेल्या नोंदी मुळे पुन्हा एकदा जगाचे लक्ष या मंदिराकडे वळले. या मंदिराच्या बांधकामात वालुकाष्म दगडाचा वापर करण्यात आलेला आहे. या मंदिराच्या सभोवती विस्तीर्ण खंदक असून १५ फूट उंच प्राकार भिंत आहे.
SL/KA/SL
30 Nov. 2023