आग्र्यात साकारणार छत्रपती शिवरायांचं भव्य स्मारक

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आग्रा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतीच केली होती.अजित पवारांनी सादर केलेल्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्पातही या स्मारकासाठी तरतूद करण्यात आली आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला ३९५ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने आग्र्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे जाहीर केलं होतं की, आग्रा शहरात ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैद करण्यात आलं होतं ती वास्तू महाराष्ट्र शासनातर्फे अधिकग्रहीत करुन त्या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्यात येईल. यासाठी आवश्यक त्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल. त्यानुसार यासंदर्भातला शासन आदेश अर्थात GR लागू करण्यात आला आहे.
स्मारक उभारणीसाठी पर्यटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास तज्ज्ञ तसेच जाणकार, तज्ज्ञांची समिती स्वतंत्रपणे स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी निधी उपलब्धता, जमीन अधिग्रहण व अनुषंगिक बाबींकरिता पर्यटन विभागाला जबाबदारी देण्यात आली आहे. या विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम पाहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभुराजे यांची आग्र्यातून सुटका आणि महाराजांच्या पराक्रमाच्या गौरवगाथेचे स्मरण पुढील पिढ्यांसाठी करून देण्यासाठी हे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
ML/ML/SL
21 March 2025