वडिलांच्या इच्छेविरुद्ध लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या मुलीला…
रायपूर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लिव्ह इन मध्ये राहूनही वडीलांकडून पालनपोषणाचा हक्क मिळावा असा दावा करणाऱ्या एका मुलीला छत्तीसगड उच्चन्यायालयाने चांगला धडा शिकवला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, रायपुर कौटुंबिक न्यायालयात संबंधित मुलीने भरणपोषण याचिका (Petition) दाखल केली होती. यामध्ये तिने ती तिच्या वडिलांंसोबत राहत नसल्याचे सांगितले होते. मात्र कोर्टाने नोटीस जारी केल्यानंतर हजर झालेल्या तिच्या वडिलांनी ती त्यांच्या इच्छेविरुद्ध आपल्या प्रियकरासोबत लिव्ह इनमध्ये राहत असल्याचा खुलासा केला. ती त्यांच्यासोबत राहत नसल्याने तिच्याशी त्यांचा कसलाही संबंध नसल्याचेही त्यांनी सांगितले.
या खटल्यात रायपुर कौटुंबिक न्यायालयाने मुलीच्या वडिलांचा हा जबाब फेटाळला होता. त्याचबरोबर त्यांना पालन-पोषणासाठी मुलीला दर महिन्याला पाच हजार रुपये देण्याचेही आदेश दिले होते. याच आदेशाविरुद्ध मुलीच्या वडिलांनी हायकोर्टात अपील केले होते. (Latest Marathi News)
लग्नानंतर मुलीच्या पालनपोषणाचा अधिकार वडिलांऐवजी नवऱ्याकडे जातो. या प्रकरणातही मुलगी तिच्या इच्छेविरुद्ध जाऊन तिच्या प्रियकरासोबत लिव्ह-इनमध्ये राहते. अशा स्थितीत तिला देखभालीच्या हक्कापासूनही वंचित ठेवले पाहिजे. असा दावा मुलीच्या वडीलांना उच्च न्यायालयात केला.
मुलीच्या वडिलांचा हा युक्तिवाद ग्राह्य धरत उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश फेटाळून लावला आहे. यासोबतच वडिलांच्या इच्छेविरुद्ध लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या मुलीला तिच्या वडिलांकडून भरणपोषण घेण्याचाही अधिकार नाही, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे.
या प्रकरणावरून लिव्ह-इन मध्ये राहण्यासारखा मोठा निर्णय घेण्यास सक्षम असणारी मुलगी आर्थिक बाबतीत मात्र आत्मनिर्भर नव्हती, असे दिसून येते. त्यामुळेच व्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना सर्वार्थाने आत्मनिर्भरता देखील महत्त्त्वाची ही बाब अधोरेखित होते.