रानवनात पळ्स फुलला .. रंगाची उधळ्ण करीत
बुलडाणा, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लाल, केशरी रंगाच्या फुलांनी बहरलेली पळसाची झाडे सध्या सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत. विदर्भातील विविध भागातील डोंगर-दऱ्यात आणि शेताचे बांध फुलांनी लगडलेल्या पळसाच्या झाडाने शोभून दिसत आहेत.A flower blossomed in the jungle… bursting with color
बुलडाण्याला लागून असलेल्या राजूर घाटातील चित्रही सध्या असंच काही आहे.
शिशिराची थंडी ओसरायला लागली, पानगळीने उघडी पडलेली वृक्षराजी नव्या पालवीचे लेणे अंगावर मिरवायला लागली की वसंताची चाहूल लागते. या वसंतात फक्त रंगांची उधळण, रंगोत्सव सुरू होतो निसर्गाचा.
शिशिरात बोडक्या झालेल्या शेताला केशरी, लाल रंगात न्हाऊ घालणारा पळस बहरला आहे. वसंताचे स्वागत करण्यासाठी नटलेला पळस चोहीकडे पाहण्यास मिळत आहे. झाडाच्या प्रत्येक फांदीवर लगडलेली फुले विस्तवाच्या गोळ्यांसारखे दिसत आहेत. २०-२५ फूट उंच असणाऱ्या पळसाला संस्कृतमध्ये पलाश म्हणतात. याचा अर्थ फुलांनी डवरलेले झाड असा होतो.
पळसाची फुले श्री सरस्वती आणि कालिमाता या दोन्ही देवींच्या पूजेसाठी मुद्दाम भक्तिभावाने वापरले जातात. कुठेही गेले तरी पळसाला पाने तीनच, अशी म्हण प्रचलित आहे. पळसाची पानेही फार उपयोगी आहेत. पूर्वी या पानांपासूनच मोठय़ा पंगतीला जेवण देण्यासाठी द्रोण आणि पत्रावळ्या बनविल्या जात. आता काळ बदलला तरी त्याचे महत्त्व कमी झालेले नाही.
पळस हा डोंगराळ भागात किंवा शेताच्या बांधावर दिसणारा वृक्ष. त्याची उंची जास्त नसते आणि तो पानगळी वृक्ष आहे, खोड आणि फांद्या वेडय़ावाकडय़ा असतात; तर साल खडबडीत राखाडी रंगाची असते. पाने आकाराने मोठी असतात म्हणूनच त्याचा द्रोण, पत्रावळी बनविण्यासाठी वापर करतात. सर्व पाने गळून गेल्यानंतर पळसाला फुलांचे घुमारे फुटतात.
सध्या पळसाची झाडे लाल, केशरी, भगवा आणि पिवळा अशा रंगांच्या फुलांनी लगडलेली दिसत आहेत. शेतात जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेताना तो दिसत आहे. बहरात आलेला पळस तर अक्षरश: ज्वालेसारखा दिसू लागला आहे.
ML/KA/PGB
27 Feb. 2023