मुंबई अग्निशमन दलात शीघ्र प्रतिसाद वाहनांचा ताफा दाखल

 मुंबई अग्निशमन दलात शीघ्र प्रतिसाद वाहनांचा ताफा दाखल


मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबई शहरातील दाटीवाटीची लोकवस्ती, अरुंद रस्ते व गल्ली, जास्त वाहतूक कोंडीचे मार्ग इत्यादी ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती उद्भवते, त्याप्रसंगी जलद प्रतिसादासाठी मुंबई अग्निशमन दलाकडे शीघ्र प्रतिसाद वाहनांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर तेथे त्वरित मदत पोहोचविता यावी या हेतूने मुंबई अग्निशमन दलात 22 शीघ्र प्रतिसाद वाहनांचा (Quick Response Vehicle) ताफा दाखल झाला आहे. या वाहनांमुळे आपत्कालीन प्रसंगांत संभाव्य हानी रोखून दुर्घटनांवर कमीत कमी वेळेत नियंत्रण ठेवण्यास मुंबई अग्निशमन दलास मदत होणार आहे.

मुंबई अग्निशमन दलाने नुकताच 22 शीघ्र प्रतिसाद वाहनांचा आपल्या ताफ्यात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या चार प्रशासकीय विभागांत ही वाहने दाखल झाली आहेत. अग्निशमन दलात एरवी वापरण्यात येणाऱया मोठ्या वाहनांच्या तुलनेत नव्याने दाखल होणाऱया क्यूआरव्ही वाहनांचा आकार लहान आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीतून मार्ग काढणे शक्य होणार आहे.

मुंबई शहरात लोकसंख्येच्या तुलनेत जागेची टंचाई असल्याने काही परिसरांत कमी जागेत नागरिक दाटीवाटीने राहतात. त्यामुळे अशा ठिकाणी जेव्हा आपत्कालीन परिस्थिती उद्भवते तेव्हा अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणी येतात. ‘डी’ आणि ‘ई’ विभाग हे मुख्य अग्निशमन केंद्राजवळ असल्याने हे दोन विभाग वगळून अन्य 22 विभागांसाठी ही वाहने सज्ज राहणार आहेत. यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. सध्या ही 22 वाहने अग्निशमन विभागाकडे आली आहेत. लवकरच ही वाहने प्रत्येक विभागासाठी नेमून कार्यान्वित करण्यात येणार आहेत. सध्या टागोर नगर (गोदरेज कंपाऊंड, विक्रोळी), नागरी प्रशिक्षण केंद्र (बोरिवली), लोढा फ्लोरेंजा इमारत (गोरेगाव), लोढा पार्क इमारत (जी दक्षिण) येथे ही वाहने सज्ज आहेत. उर्वरित 18 विभागातही लवकरच ‘क्यूआरव्ही’ पोहोचणार आहेत. A fleet of quick response vehicles has been inducted into the Mumbai Fire Brigade

सध्या मुंबई अग्निशमन दलाकडे 19 मिनी फायर स्टेशनसाठी 19 ‘क्यूआरव्ही’ आहेत. आता त्यात आणखी 22 वाहनांची भर पडणार आहे. त्यामुळे साहजिकच आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे सोपे होणार आहे. या वाहनांमध्ये 500 लिटर पाणी, रेस्क्यू टूल्स उपलब्ध आहेत. चालक, सुपरवायझर आणि दोन फायरमन असे चौघे जण या वाहनासोबत घटनास्थळी पोहोचणार आहेत. हे चारही जवान महाराष्ट्र अग्निशमन सेवा येथून किंवा शासनमान्य संस्थांकडून प्रशिक्षण घेतलेले असतील.

ML/KA/PGB
14 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *