शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटात राडा; हवेत गोळीबार …
नाशिक, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क): नाशिक शहरात शिवजयंती साजरी करण्यासाठी शिंदे गटाने बोलावलेल्या बैठकीत मोठा राडा झाला, यावेळी वादविवाद झाल्याने एकाने आपल्याजवळ रिवाल्वर काढून हवेत गोळीबार केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, देवळाली गावातील सार्वजनिक पार येथे आज सायंकाळी शिंदे गटाने शिवजयंती साजरी करण्यासाठी बैठक बोलावली होती. ही बैठक सर्वपक्षीय समितीची असल्याचे निदर्शनास आले असता ठाकरे गटाच्या पदाधिकारी यांनी त्यावर आक्षेप घेत शिंदे गटा बरोबर आम्ही जयंती साजरी करणार नाही, त्यामुळे सर्वपक्षीय हा आशय काढून टाकावा अशी मागणी केली. त्यानंतर दोन्ही गटाच्या पदाधिकरी कार्यकर्ते यांच्यामध्ये वादविवाद व शिवीगाळ झाली. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाल्यानंतर शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याने बंदुकीतून हवेत गोळीबार केला.
गोळीबार होताच दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धावपळ होऊन तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने देवळाली गावातील दुकाने पटापट बंद झाली. ही माहिती पोलिसांना समजताच नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेले पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, इतर अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.
गोळीबार झाल्याची माहिती सर्वत्र पसरल्याने नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी घटानास्थळी पोहोचून गर्दी हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र गर्दी कमी होत नसल्याने पोलीसांनी सौम्य लाठीचार्जही केला. पोलिसांनी शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याला ताब्यात घेतले असल्याचे सांगितले.
ML/KA/SL
20 Jan. 2023