महिला कैदी झाली रेडिओ जॉकी
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कारागृहांमध्ये कैद्यांना शिक्षे बरोबरच विविध कौशल्य शिकण्यासाठीही प्रोत्साहन दिले जाते. जेणेकरुन त्यांची शिक्षा पूर्ण झाल्यावर सर्वसामान्यांच्या जगात येऊन ते आत्मविश्वासाने जगू शकतील. देशातील सर्वांत मोठ्या कारागृहांपैकी एक असलेल्या भायखळा कारागृहामध्ये एका महिला कैद्याला रेडिओ जॉकी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. कारागृह विभागात पहिल्यांदाच महिला कैदी रेडिओ जॉकीचे काम करत आहे. शुक्रवारी २२ डिसेंबर २०२३ रोजी भायखळा जिल्हा कारागृह येथे महिला विभागामध्ये महिला कैद्यांच्या मनोरंजनासाठी “FM रेडिओ सेंटर” सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी या केंद्राचे उद्घाटन केले.
भायखळा जिल्हा कारागृहातील (महिला) कैदी श्रध्दा चौगुले यांनी FM सेंटरमध्ये रेडीओ जॉकीची भूमिका पार पाडली. यावेळी श्रध्दा चौगुले यांनीच अमिताभ गुप्ता यांची रेडीओ FM वर मुलाखत घेऊन कारागृह विभागातील सुधारणा व सोईसुविधेंबाबत चर्चा केली.
यावेळी अमिताभ गुप्ता यांनी कारागृहातील कैद्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ नये, हा सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन त्यांना देण्यात आलेल्या सोईसुविधा व यापुढे देण्यात येणाऱ्या सोईसुविधाबाबत चर्चा करुन मार्गदर्शन केले. तसेच परदेशी कैद्यांबाबत चर्चा केली असता परदेशी कैद्यांनी कारागृहात e-Mulakat व इतर सोईसुविधा सुरू केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यापूर्वी येरवडा मध्यवर्ती कारागृह, नागपूर मध्यवर्ती कारागृह, अमरावती मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह इत्यादी कारागृहामध्ये FM रेडिओ सेंटर सुरू करण्यात आलेली आहेत. या सर्व ठिकाणी पुरूष कैदी रेडिओ जॉकीचे काम सांभाळत आहेत परंतू भायखळा जिल्हा कारागृह येथे सुरू करण्यात आलेल्या FM रेडिओ सेंटरमध्ये प्रथमच महिला कैद्यास संधी मिळाली आहे.
SL/KA/SL
24 Dec. 2023