अरबी समुद्रात चक्रीवादळासाठी पोषक वातावरण
पुणे, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मान्सूनपूर्व काळ आणि अरबी समुद्रात घोंगावणारी वादळे हे आता दरवर्षींचेच समिकरण झाले आहे. ४ तारखेला केरळात दाखल होण्याची शक्यता असणारा मान्सून अजून लांबल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच आता पश्चिम किनारपट्टीवर वादळ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्यामुळे किनारपट्टीवरील नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून येत्या दोन दिवसांत त्याचे चक्रीवादळात (Cyclone) रूपांतर होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मुंबई, ठाणे आणि कोकणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात आज (5 जून रोजी) चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढच्या 48 तासांत अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रावरील चक्रीवादळासाठी महारागरातील स्थिती अनुकूल आहे. कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्याने त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ जर तयार झाले तर त्याचा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हवामान खाते याकडे लक्ष ठेवून आहे.
अरबी समुद्रातील संभाव्य चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीला समांतर उत्तरेच्या दिशेने सरकण्याची प्राथमिकता आहे. परिणामी या चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागामध्ये वेगाने वारे वाहतील. तसंच, या चक्रीवादळामुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात किनारपट्टीवर पाऊस पडेल आणि मान्सूनची प्रगती अधिक वेगाने होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या चक्रीवादळामुळे मुंबई, ठाणे आणि कोकणामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून तीन ते चार दिवस उशीराने दाखल होण्याची शक्यता आहे. ४ जूनला मान्सून केरळमध्ये रविवारी दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण तो अंदाज चूकला कारण मान्सून अद्याप केरळमध्ये दाखल झाला नाही. मान्सून केरळमध्ये उशिराने दाखल होणार असल्यामुळे तो महाराष्ट्रात देखील उशिराने दाखल होणार आहे.
SL/KA/SL
5 June 2023