शेतकरी महिलेने ‘ड्रोन पायलट’ म्हणून स्वतःची निर्माण केली ओळख
अहिल्यानगर, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील देवठाण येथील सुप्रिया नवले या शेतकरी महिलेने शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा निर्धार केला आणि ‘ड्रोन पायलट’ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. केंद्र शासनाच्या उमेद अभियानांतर्गत प्रधानमंत्री नमो ड्रोन दीदी या योजनेतून सुप्रिया नवले यांना इफको कंपनी मार्फत ड्रोन मिळाले आहेत.
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी या दृष्टिकोनातून त्या कमी वेळात, कमी खर्चात औषधाची बचत व्हावी यासाठी शेतकऱ्यांना ड्रोन फवारणी करून देतात. यामुळे त्यांना शाश्वत रोजगार देखील मिळाला असून, सध्या त्यांच्याकडे ड्रोन फवारणीला मोठी मागणी वाढली आहे. ड्रोनने फवारणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आता वाढू लागला आहे. ड्रोनद्वारे 10 मिनिटांमध्ये एक एकर क्षेत्रावर फवारणी होते. दिवसभरात फवारणी करुन सुप्रिया नवले या 4 ते 5 हजार रुपये कमावतात. याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे उमेद अभियान प्रधानमंत्री नमो ड्रोन दीदी योजना आणि इफको कंपनीचे आभार मानले आहेत.
देवठाण येथील जिद्दी शेतकरी महिला सुप्रिया नवले यांनी बीएस्सी ॲग्रीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातील सासवड येथे 15 दिवसांचे ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना इफको कंपनीकडून ड्रोन देण्यात आले. त्यासोबत एक इलेक्ट्रिक वाहन, जनरेटर, बॅटरी या वस्तू देण्यात आल्या. या माध्यमातून त्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ड्रोनद्वारे पिकांवर कीटकनाशक, बुरशीनाशक आणि खतांची फवारणी करतात.
शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर त्या पहिल्यांदा संबंधित शेतकऱ्यांच्या शेतावर सर्व सेटअप करतात. त्यानंतर क्षेत्र तपासून तिथे काही अडथळा आहे का, बांधावर किंवा बाजूला काही झाडे किंवा विजेच्या तारा आहेत का? हे सगळं बारकाईने पाहतात. मग ज्या क्षेत्रावर फवारणी करायची आहे, ते क्षेत्र बघून मॅपिंग करून घेतात. ऑटो मोडमध्ये अवघ्या दहा मिनिटांत एक एकर क्षेत्राची फवारणी त्या करतात.
सध्या अकोले तालुक्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांसाठी हा कुतूहलाचा विषय बनला आहे. ऊस, मका या पिकांची उंची जास्त असते. पिके कमरेच्या वर गेल्यावर त्यावर फवारणी करता येत नाही. याशिवाय साप, बिबट्या अशा प्राण्यांचाही धोका असतो. अशा स्थितीत ड्रोनने फवारणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आता वाढू लागला आहे. परंतु, ग्रामीण भागात ड्रोन वापरासमोर काही आव्हानेही आहेत.
अकोले तालुक्यातील देवठाण भागातील भागात शेतकरी पूर्वी बॅटरी पंपाने फवारणी करत होते. त्यांना एक पंप मारायला साधारण 10 ते 15 मिनिटे लागायची. 10 पंप मारायला साधारण 2 तास जायचे. आता 7 ते 10 मिनिटांमध्ये एक एकर क्षेत्रावर फवारणी होत आहे. पावसाचे वातावरण असले, तरी देखील कमी वेळेत पूर्ण फवारा होऊन जातो आणि औषध पण वाचते. याबाबत शेतकऱ्यांनी ड्रोनचालक सविता नवले आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
सुप्रिया नवले म्हणाल्या, एक एकर क्षेत्र फवारणीसाठी मी 300 रुपये घेते. पिकांवर फवारणी करून मी दिवसाला 4 ते 5 हजार रुपये कमावते. ड्रोनसारख्या तंत्रज्ञानातून पिकांवर येणाऱ्या रोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखून त्यावर वेळीच उपाय करता येतात. याद्वारे औषधाची बचत होऊन कमी मनुष्यबळात, कमी वेळेत शेतीची कामे करता येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या योजनेंतर्गत शेतीशी संबंधित ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्यासाठी प्रधानमंत्री नमो ड्रोन दीदी योजना राबविली जात आहे. बचत गटांशी संबधित महिलांना या योजनेंतर्गत शेतीकामासाठी लागणाऱ्या ड्रोन पायलटचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. महिलांना सक्षम करणे ही या योजनेची प्राथमिकता आहे. या योजनेमुळे महिलांना रोजगारासह आर्थिक सक्षम होण्यास मदत होत आहे.
याशिवाय शेतीतील उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढून शेतीत होणारा खर्च कमी होत आहे. तसेच या योजनेमुळे महिलांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली आहे. नमो ड्रोन दीदी योजना हा भारत सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. या उपक्रमास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. इफको कंपनीमार्फत महाराष्ट्र राज्यातील 30 महिलांना आणि 126 पुरुषांना प्रधानमंत्री नमो ड्रोन योजनेअंतर्गत ड्रोन वितरित करण्यात आले आहेत.
SL/ML/SL
1 Jan. 2025