बारामतीतील शेतकऱ्याची कॅमेऱ्यासमोर आत्महत्या

 बारामतीतील शेतकऱ्याची कॅमेऱ्यासमोर आत्महत्या

बारामती, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बारामतीतील पवार घराण्यातील दोन मातब्बर व्यक्ती लोकसभा निवडणूकासाठी आमने-सामने उभ्या ठाकलेल्या आहेत. अशातच येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. बारामती येथील लाटे गावातील एका शेतकऱ्याने कॅमेऱ्यासमोर आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. हनुमंत सणस असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. बारामती तालुक्यातील लाटेमध्ये सणस यांचे शेत आहे.

आत्महत्यापूर्वी हनुमंत सणस यांनी फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री कार्यालयासह उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांसह संबंधित कार्यालयांना निवेदन पाठवले.या निवेदनात त्यांनी सरकारी कर्मचारी, पोलीस आणि गावातील शेतकऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याचे नमूद केले. तसेच न्याय द्यावा अशी मागणी केली.

संबंधित शेतकऱ्याने पाटबंधारे विभाग महावितरण विभाग आणि पोलिसांना यांच्यावर गंभीर आरोप करत विष प्राशन केले. मयत शेतकऱ्याच्या भावाने स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून दोषींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणीने जोर धरला आहे.

सणस यांच्या शेतामध्ये परिसरातील काही शेतकऱ्यांनी विनापरवाना विद्युतधारक विद्युत पंप बसवलेले, जे सणस यांनी काढायला सांगितले. मात्र, याउलट त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी मिळाली. यानंतर सणस यांना पोलिसांचेही फोन येऊ लागले. याच दबावातून सणस यांनी आत्महत्या केल्याचे त्यांचे मोठे भाऊ जयवंत सणस यांनी तक्रारीत म्हटले आहे.

सणस यांनी न्याय न मिळल्यास आत्महत्या करेल, असा इशारा दिला होता. तसेच माझ्या मृत्युला महावितरणची कोऱ्हाळे बुद्रूक शाखा, वडगाव निंबाळकर जलसंपदा विभाग व वडगाव पोलिस ठाणे तसेच बेकायदेशीररित्या पाणी उचल करणारे लोक जबाबदार असतील, असे त्यांनी निवेदनात नमूद केले होते.

सणस यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्यानंतर त्यांचे मोठे भाऊ जयवंत सणस यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी सहा जणांविरोधात शिवीगाळ, दमदाटी करत मानसिक त्रास आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

SL/ML/SL

15 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *