धर्मांतराचा प्रयत्न करणाऱ्या दोन मिशनरींवर पुण्यात गुन्हा दाखल
पुणे, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यातील कर्वेनगर येथील गाेसावी वस्ती, कॅनाॅल रस्ता या ठिकाणी एका घराच्या छतावर पास्टर गाेपळ रणदिवे आणि सिस्टर आशा रणदिवे हे बंधनमुक्त सेवा कार्य प्रभुभाेजन कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध आजार हे आशीर्वाद तेल (ब्लेसिंग आॅइल) प्रभूची गाणी व डान्स करून बरे हाेतात असे सांगून अनिष्ट व अघाेरी प्रथांची जाहिरात करत धर्मांतराचा प्रयत्न करत हाेते. याप्रकरणी धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने शब्द उच्चारले म्हणून या दाेघांविराेधात अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वैभव विठ्ठल भिकाले (२६, रा. गुजरात काॅलनी, काेथरूड, पुणे) यांनी पोलिसांकडे आराेपीविराेधात फिर्याद दाखल केली आहे. यापूर्वीदेखील अशा प्रकारचे कार्यक्रम उत्तमनगर, वारजे, रामवाडी, राहुलनगर, तेजस साेसायटी, पृथ्वी हाॅटेल परिसरात करण्यात आल्याची तक्रार हिंदू संघटनांनी केली आहे. तक्रारदारांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ८ डिसेंबर रोजी रात्री गोपाळ रणदिवे व त्यांची पत्नी सिस्टर आशा रणदिवे या बंधनमुक्त सेवा कार्य प्रभुभोजन कार्यक्रमासाठी इंगवले यांच्या कर्वेनगर येथील घराच्या टेरेसवर गेले होते. या ठिकाणी गेल्यानंतर सिस्टर आशा रणदिवे यांनी उपस्थितांपैकी काही लोकांना आलेले अनुभव सांगितले.
ज्यांचा बाप्तिस्मा झालेला नाही त्यांचा बाप्तिस्मा करून घेऊ, असे सांगितले होते. पास्टर गोपाळ रणदिवे आणि आशा रणदिवे यांनी बाप्तिस्मा म्हणजे पवित्र पाण्यात बुडवून काढून तो आता प्रभू येशूचा झाल्याचे जाहीर करायचा कार्यक्रम असतो, असे सांगितले. त्यानंतर घरातले सर्व देव पाण्यात सोडून देऊन केवळ येशू हाच देव राहतो, असे त्यांनी सर्वांना सांगितले. तसेच प्रभू येशूला तुम्ही स्वीकारल्यानंतर तुमची सैतानापासून सुटका होईल, असे सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
एका लहान मुलीच्या फुटलेल्या आणि पू आलेल्या कानासंदर्भात त्यांनी तज्ज्ञाकडे न नेता आशीर्वाद तेल (ब्लेसिंग आॅइल) त्या मुलीला लावले आणि ती मुलगी बरी झाली. त्याचबरोबर एका लहान मुलाला नायट्यासारखा आजार झाला होता, जो पूर्ण शरीरावर पसरलेला होता, तो केवळ प्रभूच्या ब्लेसिंग आॅइलमुळे बरा झाला. त्यामुळे आपण सर्वजण प्रभूचा गौरव करूया आणि गाणी म्हणूयात. त्याचबरोबर उपस्थितांपैकी काही लोकांना आलेल्या अडचणीत डान्स आणि ब्लेसिंग आॅइलच्या माध्यमातून फरक पडला, असे त्यांनी सांगितले.