निर्माती एकता कपूर आणि तिच्या आईवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

 निर्माती एकता कपूर आणि तिच्या आईवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डेलिसोप मालिकांची क्विन, प्रसिद्ध निर्माती एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्यावर ‘अल्ट बालाजी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अल्पवयीन मुलींच्या अश्लील दृश्यांचे प्रदर्शन केल्याबद्दल पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘गंदी बात’ या वादग्रस्त वेब सीरिजच्या सहाव्या सीझनमुळे एकता कपूरच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे. या तक्रारीत असे नमूद केले आहे की, फेब्रुवारी २०२१ ते एप्रिल २०२१ या कालावधीत, ‘अल्ट बालाजी’ने त्यांच्या एका वेब सीरिजमध्ये अल्पवयीन मुलींचे अश्लील दृश्य दाखवले आहेत.

एकता कपूर आणि ‘अल्ट बालाजी’ने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र या प्रकरणामुळे एकता कपूरच्या कारकिर्दीवर मोठा परिणाम होऊ शकतो आणि त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सवर देखील याचा परिणाम होऊ शकतो. तसेच डिजिटल माध्यमांमध्ये प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या अनिर्बंध कंटेंटला वेसण घालणाऱ्या सेन्सॉरची अत्यावश्यकता या प्रकरणातून अधोरेखित झाली आहे.

तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रार पत्रात असा आरोप केला आहे की, आधी या वेब सीरिजमध्ये सिगारेटचा वापर करत महापुरुषांचा आणि संतांचा अपमान करण्यात आला होता. या घटनेनंतर याच सीरिजमध्ये पोक्सोच्या नियमांचे उल्लंघन करत काही दृश्ये दाखवण्यात आली आहेत. यामध्ये माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००, वुमन प्रोहिबिशन ॲक्ट १९८६ आणि सिगारेट व इतर तंबाखु उत्पादने अधिनियम २००३ यासारख्या कायद्यांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले आहे. गुन्हा दाखल करणाऱ्या तक्रारदाराने यामध्ये बालकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या कायद्यांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट केले आहे. ही माहिती न्यायालयाने घेतलेल्या टिप्पण्या आणि देशभरातील बाललैंगिक घटनांच्या वाढत्या चिंतेनंतर उघडकीस आली आहे. यामुळे एकता कपूर आणि ‘अल्ट बालाजी’ या कंपनीच्या कामकाजावर आता गंभीर परिणाम होऊ शकतो.

SL/ML/SL

19 Oct. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *