मुख्यमंत्र्यांची बदनामी करणाऱ्या १२ सोशल मिडिया प्रोफाईल्स विरोधात गुन्हा दाखल
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोशल मिडियाचा गैरवापर करत नेत्यांवर असंविधानिक भाषेत टिका करणारी अकाऊंट्स आता कायद्याच्या निशाण्यावर असणार आहेत. नव्या सरकारमध्ये गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर आता सायबर गुन्ह्यासंदर्भात सरकारने काही पावलं उचलली आहेत. सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात बदनामीकारक पोस्ट व व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या 12 प्रोफाईलविरोधात महाराष्ट्र सायबर विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्यावतीने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या जुन्या भाषणांमध्ये छेडछाड करून ती समाज माध्यमांवर पोस्ट करण्यात आली होती. याप्रकरणी समाज माध्यमांवरील संशयित प्रोफाईल वापरकर्त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
याप्रकरणी ट्वीट (एक्स), फेसबुक, इन्स्टाग्राम व यू ट्युबवरील 12 प्रोफाईलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. भारत भावला शिंदे, शुद्धोधन सहजराव, नागपूर काँग्रेस सेवादल, सौरभ सिंह चौहान, मुकेश लवले, सुरेश काळे, प्रसाद साळवी, वरद कणकी, अमोल कांबळे, सय्यद सलीम, द स्मार्ट 230 के व विष्णू भोतकर यांनी अपूर्ण अथवा छेडछाड केलेला व्हिडिओ प्रोफाईलवर अपलोड केला आहे.
मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक या चित्रफिती अपलोड करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३५३ (१) (ब), ३५६ (२), १९२, ३ (५) व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
SL/ML/SL
25 Dec. 2024