१ लाखाचे कर्करोगावरील औषध मिळणार २८ हजारांना
अहमदाबाद, दि. २३ : येथील झायडस लाइफ सायन्सेसने जगातील पहिले निवोलुमॅब बायोसिमिलर औषध ‘तिष्ठा’ भारतात बाजारात आणले आहे. हे औषध मूळ ब्रँड Opdivoच्या तुलनेत एक चतुर्थांश किंमतीत उपलब्ध असून, त्यामुळे कर्करोग उपचार अधिक परवडणारे झाले आहेत. असा दावा कंपनीने केला आहे.
झायडसने भारतात बायोसिमिलर औषध आणले आहे. बायोसिमिलर म्हणजे मूळ ब्रँडेड औषधासारखेच कार्य करणारे, परंतु कमी किंमतीत उपलब्ध असणारे औषध. ही औषधे यीस्ट व जीवाणूंपासून तयार केली जातात. झायडसने निवोलुमॅब या रोगप्रतिकारक औषधाचा पहिला बायोसिमिलर भारतात दाखल केला असून त्याला ‘तिष्ठा’ असे नाव दिले आहे. हे औषध कर्करोगाच्या पेशींशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय करते.
मूळ निवोलुमॅब औषधाची किंमत १०० मिलीग्रॅमसाठी ५० हजार ते १ लाख रुपये होती. मात्र झायडसने ‘तिष्ठा’ची किंमत १०० मिलीग्रॅमसाठी २८,९५० रुपये आणि ४० मिलीग्रॅमसाठी १३,९५० रुपये ठेवली आहे. म्हणजेच मूळ औषधाच्या तुलनेत ही किंमत जवळपास एक चतुर्थांश आहे.
या औषधामुळे भारतातील ५ लाखांहून अधिक रुग्णांना फायदा होणार आहे. झायडस लाइफ सायन्सेसचे व्यवस्थापकीय संचालक शर्विल पटेल यांनी सांगितले की, कंपनी उच्च दर्जाची बायोसिमिलर इम्युनोथेरपी सहज उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे. विशेष म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे झायडसला पेटंट संपण्यापूर्वीच हे औषध बाजारात आणण्याची परवानगी मिळाली.
हे औषध फुफ्फुसाचा कर्करोग, त्वचेचा मेलानोमा, मूत्रपिंडाचा कर्करोग, तसेच हॉजकिन लिम्फोमा यांसारख्या अनेक प्रकारच्या कर्करोगांवर उपयुक्त ठरणार आहे.
SL/ML/SL
SL/ML/SL