भारताच्या ‘एज्युकेट गर्ल्स’ला रॅमन मॅगसेसे पुरस्कार

 भारताच्या ‘एज्युकेट गर्ल्स’ला रॅमन मॅगसेसे पुरस्कार

मुंबई, दि. १ : ‘फाउंडेशन टू एज्युकेट गर्ल्स ग्लोबली’ या ‘एज्युकेट गर्ल्स’ म्हणून परिचित असलेल्या संस्थेला रॅमन मॅगसेसे पुरस्कार जिंकून इतिहास घडवला आहे. हा पुरस्कार मिळवणारी ती पहिली भारतीय स्वयंसेवी संस्था ठरली आहे, असे मॅगसेसे पुरस्कार फाऊंडेशनच्या निवेदनात म्हटले आहे.

‘एज्युकेट गर्ल्स’ला आशियातील सर्वोच्च सन्मान मिळाला असून, “मुली व तरुण महिलांच्या शिक्षणाद्वारे सांस्कृतिक पूर्वग्रहांचा सामना करण्याच्या त्यांच्या कटिबद्धतेसाठी, निरक्षरतेच्या जोखडातून त्यांची मुक्तता करण्यासाठी आणि त्यांना कौशल्य, धैर्य व आत्मविश्वास देऊन त्यांच्या संपूर्ण मानवी क्षमतेपर्यंत पोहोचण्यास सक्षम बनविण्यासाठी” हा पुरस्कार देण्यात आल्याचे मॅगसेसे पुरस्कार फाऊंडेशनने म्हटले.

‘एज्युकेट गर्ल्स’ला मिळालेला रॅमन मॅगसेसे पुरस्कार हा भारतासाठी ऐतिहासिक क्षण असून, देशातील एका दुर्गम गावातील एका मुलीपासून सुरू झालेल्या लोकशक्तीवर आधारित चळवळीवर यामुळे जागतिक स्तरावर प्रकाशझोत पडला आहे, असे या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापिका सफिना हुसेन यांनी सांगितले.

हुसेन म्हणाल्या, “रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय स्वयंसेवी संस्था ठरणे हे ‘एज्युकेट गर्ल्स’साठी व देशासाठी ऐतिहासिक क्षण आहे. या सन्मानामुळे भारतातील मुलींच्या शिक्षणासाठी लोकशक्तीवर आधारित चळवळीवर जागतिक प्रकाशझोत पडला आहे. एका दुर्गम गावातील एका मुलीपासून सुरू झालेली ही चळवळ अखेर संपूर्ण समुदायांचे रूपांतर घडवू लागली, परंपरा आव्हान देऊ लागली आणि विचारसरणीत बदल घडवू लागली.”

राजस्थानपासून सुरुवात करून, ‘एज्युकेट गर्ल्स’ने शिक्षणाच्या दृष्टीने सर्वाधिक गरजू समुदाय ओळखले, शाळेत नसलेल्या मुलींना शाळेत आणले आणि त्या उच्च शिक्षणासाठी आवश्यक पात्रता आणि रोजगारक्षमतेपर्यंत टिकून राहतील यासाठी प्रयत्न केले, असे निवेदनात म्हटले आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *