कोकणात गौरी पूजनाचा उत्साह …

सिंधुदुर्ग दि १– काल गौराईच्या आगमनानंतर आज जिल्ह्यात सर्वत्र गौरीपूजनाचा उत्साह दिसून येत आहे . गौरीचे लाड पुरवण्यासाठी सुवासिनी सज्ज झाल्या आहेत. गौरीला सालंकृत नटवले जाते. दाग दागिने मढवले जातात. सुवासिक फुलांचा गजरा , वेणी माळली जाते. या सर्वांमध्ये महत्त्वाचं असते ते म्हणजे काकडीच्या फुलांचा हार. गौरीला सगळ्यात जास्त प्रिय असतो म्हणून तो अवश्य गौरीच्या गळ्यात घातला जातो. गौरी गणपती एकत्र जरी घरात असले तरी गणपतीला शाकाहारी नैवेद्य दाखवतानाच माहेरवाशिण म्हणून आलेल्या गौरीला मात्र मांसाहाराचा नैवेद्य काही ठिकाणी दाखवला जातो.
कोकणातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गौरीच्या पुढे ओवसा भरणे .आज ओवसा भरण्याच्या रूढी परंपरागत कार्यक्रम देखील संपन्न झाला. नवदांपत्य गावातील सर्व घरांमध्ये जाऊन गौरीच्या पुढ्यात ओवसा ठेवून घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेतात. घरातील सुवासिनी आपल्यापेक्षा वडीलधाऱ्यांना ओवसा देऊन त्यांचा आशीर्वाद घेतात .
ओवसा हा विधी म्हणजे घराण्यामध्ये असलेल्या रुढी , परंपरा, रितीरिवाज यांच्या वसा जणू पुढच्या पिढीला दिला जात आहे, असंच प्रतीत होते. उद्या गौरी विसर्जन केले जाईल.ML/ML/MS