सुपारीपासून बनवले ४ फूट उंची चे पर्यावरणपूरक बाप्पा
वाशीम दि २९:– वाशीमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे दरवर्षी गणेशोत्सवात एक वेगळीच परंपरा दिसून येत आली आहे. गावातील जय भवानी जय शिवाजी शेतकरी गणेश मंडळाकडून सुपारीपासून गणपती बाप्पाची ४ फूट उंचीची मूर्ती साकारण्यात आली आहे.या मूर्तीसाठी एकूण ९ किलो सुपारीचा वापर करण्यात आला. खास म्हणजे मंडळातील ९ सदस्यांनी प्रत्येकी एक किलो सुपारी दिली आणि सर्वांनी मिळून ही मूर्ती साकारली.

मूर्ती घडवण्याचे काम १७ ऑगस्ट रोजी सुरू झाले होते आणि दहा दिवसांच्या मेहनतीनंतर ती पूर्ण झाली. मागील अनेक वर्षापासून सोयाबीनचा बाप्पा, कांद्यापासून निर्मित बाप्पा, शेंगदाण्याचे पासून निर्मित बाप्पा नारळ पासून निर्मिती बाप्पा केळाचे बाप्पा अशा पर्यावरण पूरक गणेशाची मूर्ती जय भवानी या शेतकऱ्याच्या मंडळाकडून दरवर्षी साकारण्यात येत आहेत.
हिंदू धर्मात सुपारीला अत्यंत शुभ मानले जाते. गणेश पूजेत सुपारी गणपतीचे प्रतीक आहे, कारण सुपारी हे पूर्ण फळ मानले जाते आणि त्यातून समृद्धी व शुभत्व येते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे सुपारीपासून तयार झालेला हा बाप्पा श्रद्धा, परंपरा आणि पर्यावरणपूरकतेचा संगम मानला जात आहे. या बाप्पासमोर मंडळाने गणपती बाप्पाकडून शासनाला सद्बुद्धी लाभो अशी प्रार्थना केली. गावातील नागरिकांनीही या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आहे.कामरगावचा हा सुपारी बाप्पा सध्या केवळ गावापुरता मर्यादित न राहता, पर्यावरणपूरकतेचा आदर्श आणि शेतकरी एकतेचा संदेश म्हणून सर्वत्र चर्चेत आला आहे..ML/ML/MS