MPSC ने रद्द केले तब्बल १२ प्रश्न
मुंबई, दि. २६ : MPSC द्वारे घेतली जाणारी प्रत्येक परीक्षाच काही ना काही कारणास्तव चर्चेत येत असते. गोंधळ घालण्यासाठीच प्रसिद्ध असलेल्या या आयोगाने आता एक नवीनच विक्रम केला आहे. आयोगाने गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त (मुख्य) परीक्षा–२०२४ ची अंतिम उत्तरतालिका जाहीर करताना तब्बल १२ प्रश्न रद्द केले आहेत. तर दोन प्रश्नांचे पर्याय बदलले आहेत. एकूण १४ प्रश्नांमध्ये झालेल्या बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर मोठा परिणाम होणार असून राज्यातील हजारो उमेदवार चिंतेत सापडले आहेत.
२९ जून २०२५ रोजी ही परीक्षा झाली होती. प्रथम उत्तरतालिकेवर विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या हरकती व तज्ञांचे अभिप्राय लक्षात घेऊन आयोगाने अंतिम उत्तरतालिका निश्चित केली. मात्र आता या उत्तरतालिकेविषयी कोणतेही निवेदन किंवा पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रश्न रद्द होण्याची ही एमपीएससीच्या इतिहासातील पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
SL/ML/SL