मराठा आरक्षण मागणी, न्या शिंदे समितीला मुदतवाढ, घडामोडींना वेग

 मराठा आरक्षण मागणी, न्या शिंदे समितीला मुदतवाढ, घडामोडींना वेग

मुंबई, दि. २६ : मराठा आरक्षणावरुन आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे. 29 ऑगस्ट रोजी जरांगे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत येण्याचा निर्धार केला असून हजारो समर्थकांसह ते मुंबईत आझाद मैदानावर पोहोचून उपोषण चालू करणार आहेत.
आज (26 ऑगस्ट) झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मराठा आरक्षण आणि त्यासाठी चालू असलेल्या प्रक्रियेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयांबाबत मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिली आहे.

मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना, मनोज जरांगे यांनी हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेटमधील नोंदीनुसार आम्हाला ओबीसी प्रमाणपत्र मिळावे, अशी मागणी जरांगे यांची आहे. याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. कायदेशीर प्रक्रिया चालू आहेत. हैदराबाद गॅझेटच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. या समितीला आता आणखी सहा महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हैदराबादच्या गॅझेटचा अभ्यास करून त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. कारण ही प्रक्रिया क्लिष्ट आहे. जरांगे यांनीच केलेल्या मागणीनुसार शिंदे समितीला मुदतावाढ देण्यात आली आहे, असे राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.

मला वाटतं जरांगे यांची जी लढाई चालू आहे, त्याबाबत आम्ही चर्चा केली आहे. सर्वांचीच भूमिका सकारात्मक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात आले होते. महाविकास आघाडीला हे आरक्षण टिकवण्यात अपयश आले. पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले. या सरकारने पुन्हा मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले होते. हे आरक्षण अजूनही टिकूनही आहे. आरक्षणाच्या बाबतीत शासनाची कोणतीही नकारात्मक भूमिका नाही. फक्त कायद्याच्या चौकटीत बसवून हे काम करावे लागेल, असेही राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.

दरम्यान मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत येण्याचा निर्धार केला असून हजारो समर्थकांसह ते मुंबईत आझाद मैदानावर पोहोचणार आहेत. जरांगे यांनी यासाठी मागितलेली परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणी साठी मुंबईत येणारे आंदोलन बेकायदा मुंबईत येतील का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आम्ही यासाठी न्यायालयात दाद मागू अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली आहे.

या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. जरांगे पाटील यांच्या मागण्या आम्ही समजून घेऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल म्हणाले होते, त्यानंतर ही भेट झाली आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *