पनवेलमधील नैना प्रकल्पातील चुकीच्या नियोजनावर मुुख्यमंत्र्यांसोबत बैठक

मुंबई , दि. २६:– नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) प्रकल्पात कामकाजाच्या पातळीवर चुकीचे नियोजन सुरु असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुढील आठवड्यात बैठक आयोजित करण्यात येईल, अशी भूमिका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली. तर नैनाने गावठाणे वगळून विकास आराखडा तयार करावा तर नोंदणी महानिरीक्षकांनी अधिकृत बांधकामांची नोंदणी करावी असे आदेशही दिले.

पनवेलमधील बहुचर्चित नैना प्रकल्पातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी सिडकोच्या नकारात्मक भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत, महसूलमंत्र्यांनी अनेक कठोर सूचना दिल्या. आमदार विक्रम पाटील यांच्यासह अनेक स्थानिक प्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि सिडकोचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
•सिडकोच्या भूमिकेवर टीका करताना आमदार विक्रांत पाटील यांनी सांगितले की, सिडकोने नैना प्रकल्पासाठी जमीन ताब्यात घेतली आहे, मात्र विकासाची कोणतीही कामे होत नाहीत. सर्व प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहेत. सिडकोच्या या नकारात्मक मानसिकतेमुळे लाखो नागरिकांचे नुकसान होत आहे. विकासाच्या नावाने केवळ जागा अडवून ठेवल्या जात आहेत.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने काही महत्त्वाचे आदेश दिले आहेत. ज्या गावठाणांना नैनाने टाऊन प्लॅनिंगमधून वगळले आहे, त्यांची नोंदणी त्वरित सुरू करावी. चुकीचा अहवाल दिल्यास नैना जबाबदार असेल, असेही स्पष्ट करण्यात आले.या प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातून ग्रामपंचायतीची गावठाणे तात्काळ वगळण्याचे आदेश दिले. जीपीएस (GPS) द्वारे वगळलेल्या भागांची नोंदणी त्वरित सुरू करावी. बी-झोनमध्ये जी बांधकामे झाली आहेत, ती नैनाने तपासून १५ दिवसांत अहवाल सादर करावा. हा अहवाल आल्यानंतर बांधकाम परवानग्या आणि नोंदणी प्रक्रिया सुरू करावी.
• मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
जिल्हाधिकाऱ्यांनी २०१३ पासून ११३ परवानग्या दिल्याचे स्पष्ट केले. त्यानंतरही सिडकोने जागा अडवून ठेवली आहे, असे ते म्हणाले. यावर महसूलमंत्र्यांनी सिडकोच्या चुकीच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली. या गंभीर प्रश्नावर अंतिम तोडगा काढण्यासाठी पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याचे निर्देशही महसूलमंत्र्यांनी दिले. या बैठकीत नैना प्रकल्पातील सर्व समस्यांवर सविस्तर चर्चा होऊन योग्य निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.ML/ML/MS