८० वर्षांचा प्रवास : हिंदूकॉलनी गणेशोत्सव मंडळ, सामाजिक भान, सांस्कृतिक वारसा आणि कलाविष्काराचे केंद्र

मुंबई, दि २४ : जितेश सावंत
संपूर्ण महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे. अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात आणि जगभरात, जिथे जिथे हा उत्सव साजरा केला जातो तिथे आनंद, जोशपूर्ण उत्साह आणि मंगलमय वातावरणाची अनुभूती होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांपासून लाभलेली उत्सवाची परंपरा लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी १८९३ साली सार्वजनिक स्वरूपात आणली. राष्ट्रीय एकात्मता व जागृतीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू झालेली ही परंपरा आजही कायम आहे. या सार्वजनिक परंपरेतील महाराष्ट्रातील एक अग्रगण्य मंडळ म्हणजे दादर (पूर्व) येथील हिंदू कॉलनी गणेशोत्सव मंडळ. उत्सवाचे पावित्र्य जपत कुठलाही दिखावा टाळत हा उत्सव आजही अत्यंत दिमाखात साजरा होत असून यंदा ८० व्या वर्षात पदार्पण करत आहे.
आठ दशकांचा दिमाखदार वारसा लाभलेल्या या उत्सवात आजवर महाराष्ट्रासह देशातील अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवला असून, आपली कला सादर केली आहे. दर्जेदार व्यावसायिक नाटके हा या उत्सवाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. नाट्य व चित्रपट सृष्टीतील अनेकांचे करिअर याच मंचावरून सुरू झाले. स्थानिक कलाकारांना संधी देणारा हा महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित रंगमंच म्हणूनही ओळखला जातो.
स्थानिक कार्यक्रम, विविध स्पर्धा बुद्धिबळ, वक्तृत्व, निबंध, स्मरणशक्ती, रांगोळी, चित्रकला, पाठांतर तसेच क्रिकेट, बॅडमिंटन यांसारखे खेळ यांमुळे मुलांचा शारीरिक व बौद्धिक विकास घडवणारा हा उत्सव ठरला आहे. व हि परंपरा आजही अविरतपणे सुरु आहे. आज देशात आणि परदेशात वकील, डॉक्टर, कलाकार, गायक, संगीतकार, चित्रपट निर्माते, खेळाडू तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रांत आपली छाप पाडणाऱ्यांची सुरुवात याच उत्सवातून झाली आहे, हा त्यांच्यासाठीही अभिमानाचा विषय आहे.
आकर्षक व नीटनेटकी सजावट, सुंदर आरास, दैनंदिन आरत्या, पूजेचे विधी हे या उत्सवाचे अजून एक वैशिष्ट्य आहे. मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वजण यात उत्साहाने सहभागी होतात.
हा उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यात येथील नागरिक, पदाधिकारी, देणगीदार आणि हितचिंतकांचा मोठा वाटा आहे. सामाजिक भान जपत सार्वजनिक गणेशोत्सवाच्या या परंपरेला हिंदू कॉलनी गणेशोत्सव मंडळ आपले योगदान देत आहे आणि पुढेही तेच योगदान निष्ठेने देत राहील.ML/ML/MS