हे आहेत देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री

नवी दिल्ली, दि. २३ : निवडणूक सुधारणांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) आणि नॅशनल इलेक्शन वॉच (NEW) यांनी देशातील सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सांपत्तीक स्थितीचा आढावा घेत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या मध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे ९३१ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. देशातील सध्याच्या ३० मुख्यमंत्र्यांची एकूण मालमत्ता १६३२ कोटी रुपयांची आहे. यातील सुमारे ५७% संपत्ती चंद्राबाबूंकडे आहे. त्यांच्याकडे ८१० कोटी रुपयांची जंगम मालमत्ता (रोख ठेवी, दागिने इ.) आणि १२१ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता (घर, जमीन इ.) आहे. चंद्राबाबूंवर १० कोटी रुपयांचे कर्जही आहे.
त्याच वेळी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे सर्वात कमी मालमत्ता आहे. त्यांच्याकडे फक्त १५.३८ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. ममता यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही.
२७ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांच्या सर्व ३० विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. गेल्या निवडणुकीत लढण्यापूर्वी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांवरून ही माहिती घेण्यात आली आहे. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे.
सर्वाधिक संपत्ती असलेले ५ मुख्यमंत्री
चंद्राबाबू नायडू – आंध्र प्रदेश
पेमा खांडू – अरुणाचलप्रदेश
सिद्धरामय्या – कर्नाटक
नेफियु रिओ – नागालँड
मोहन यादव – मध्यप्रदेश
SL/ML/SL