मालकानेच रचला 32 कोटींच्या हिरे चोरीचा बनाव

सुरत, दि. २० : गुजरातमधील सुरत शहरात झालेल्या ३२ कोटी रुपयांच्या हिऱ्यांच्या चोरीच्या प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी कंपनीचा मालक असल्याचे निष्पन्न झाले. विम्याचे पैसे हडपण्यासाठी मालकाने हा संपूर्ण कट रचला होता. आरोपीने त्याचे दोन मुलगे, ड्रायव्हर आणि त्याचे दोन साथीदार या कटात सामील केले होते. कंपनीची वार्षिक उलाढाल ३०० कोटी रुपये आहे हिरे कंपनीचे मालक देवेंद्रकुमार चौधर हे सुरतमध्ये डीके मारवाडी म्हणून ओळखले जातात. वरछा येथील खोडियानगरमध्ये राहणारे देवेंद्र हे सर्वात मोठ्या हिरे व्यापाऱ्यांपैकी एक आहेत.
१० लाख रुपये देऊन घडवली चोरी कापोद्रा पोलिस आणि गुन्हे शाखेने मिळून या मोठ्या फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. कापोद्रा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डीके अँड सन्स डायमंड कंपनीचे मालक देवेंद्रकुमार चौधरी यांनी चौकशीदरम्यान सांगितले आहे की त्यांचे कर्ज वाढले होते. त्यामुळे त्यांनी हा कट रचला. चोरीसाठी ड्रायव्हर आणि त्याच्या दोन साथीदारांना १० लाख रुपये देण्याचा सौदा झाला होता. ५ लाख रुपये आगाऊही देण्यात आले होते.
१५ ते १७ ऑगस्टदरम्यान झाली चोरी ही चोरी १५ ते १७ ऑगस्ट दरम्यान कापोद्रा येथील एका कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या डीके अँड सन्स डायमंड कंपनीत झाली. १५ ऑगस्ट, जन्माष्टमी आणि त्यानंतरच्या रविवारमुळे कॉम्प्लेक्स आणि मार्केट तीन दिवस बंद होते. देवेंद्र कुमार चौधरी यांनी कापोद्रा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, १५ ऑगस्ट रोजी त्यांनी पॉलिश केलेले आणि खडबडीत हिरे तिजोरीत सोडले होते.
यानंतर, १८ ऑगस्ट रोजी सकाळी जेव्हा ते कंपनीत पोहोचले तेव्हा चोरी झाल्याचे उघडकीस आले. चोरट्यांनी गॅस कटरने तिजोरी कापून ३२.६ कोटी रुपयांचे हिरे आणि रोख रक्कम चोरून नेली होती. वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि एफएसएल टीम घटनास्थळी पोहोचली आणि तपास सुरू केला.