अमेरिकेत छत्रपती शिवरायांच्या कीर्तीरथाची भव्यदिव्य मिरवणूक

न्यूयॉर्क, दि. २० : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये 17 ऑगस्ट 2025 रोजी ‘इंडिया डे’ परडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती फाऊंडेशनने (Chhatrapati Foundation) छत्रपती शिवाजी महाराजांचा कीर्तीरथ सादर केला आणि भव्य मिरवणूक काढली. अमेरिकेमध्ये वास्तव्यास असलेले भारतीय मिरवणुकीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. लेझीम आणि ढोलच्या गजराने सारेजण भारावून गेले होते.
परेड ग्रँड मार्शलचा मान अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवेरकोंडा यांना देण्यात आला होता. मिशीगन राज्याचे US हाऊस ऑफ रेप्रेझेंटेटीव्ह (खासदार) श्री ठाणेदार यांनी कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून उपस्थिती दर्शवली होती. ठाणेदार यांनी रथावरून रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या प्रचंड जनसमुदायाला अभिवादन केले. न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक आडम्स यांनी परेडचा शुभारंभ केला.
विद्यार्थी आणि तरुणांच्या नेतृत्वामध्ये छत्रपती फाऊंडेशन न्यूयॉर्क ही संस्था मागील 15 वर्षांपासून न्यूयॉर्कमध्ये शिवजयंती, जिजाऊ जयंती, अहिल्यादेवी जयंती, आंबेडकर जयंतीच्या माध्यामातून अनेक सांस्कृतिक उपक्रम राबवत असते. यावर्षी संस्थेतर्फे न्यूयॉर्कस्थित भारतीय दूतावासामध्ये शिवजयंतीचेही आयोजन करण्यात आले होते.