निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार

नवी दिल्ली,दि. १९ : देशातील विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीकडून निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांची उपराष्ट्रपतीपदासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश म्हणून त्यांनी २००७ ते २०११ या कालावधीत न्यायदानाची जबाबदारी पार पाडली होती. त्यांच्या निष्पक्ष आणि संविधाननिष्ठ भूमिकेमुळे त्यांना न्यायव्यवस्थेत विशेष मान्यता मिळाली आहे. आंध्र प्रदेशचे रहिवासी असलेल्या रेड्डी यांनी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि गोवा राज्याचे पहिले लोकायुक्त म्हणूनही कार्य केले आहे.
‘इंडिया’ आघाडीने त्यांच्या उमेदवारीची घोषणा करताना लोकशाही मूल्यांचे रक्षण आणि संविधानाच्या चौकटीत काम करणाऱ्या व्यक्तीला या पदावर आणण्याचा निर्धार व्यक्त केला. याआधी उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून सी. पी. राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर झाली होती. त्यामुळे या निवडणुकीत दोन अनुभवी आणि प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ९ सप्टेंबर रोजी होणार असून त्याच दिवशी मतमोजणीही पार पडणार आहे. देशाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च पदासाठी होणारी ही निवडणूक केवळ राजकीय नव्हे, तर संविधानिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विविध क्षेत्रांतून त्यांचे स्वागत करण्यात येत असून अनेकांनी त्यांच्या अनुभवाचा देशाला लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
SL/ML/SL