उपमुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर केले ‘लाडकी सून’ अभियान

ठाणे, दि. १८ : ‘लाडकी बहीण’ योजनेच्या यशानंतर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी ठाणे शहरातून ‘लाडकी सून’या राज्यव्यापी अभियानाची त्यांनी सुरुवात केली आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश घरगुती अत्याचार आणि अन्यायाला बळी पडणाऱ्या महिलांना तात्काळ मदत करणे हा आहे. या अभियानांतर्गत पीडित सुनांना मदत करण्यासाठी एक हेल्पलाइन नंबर (Helpline number) जारी करण्यात आला आहे. 8828862288या नंबरवर पीडित महिला थेट संपर्क साधून मदत मागू शकतात. त्यांनी दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबवले जाणार असून, प्रत्येक शिवसेना (शिंदे गट) शाखेतून पीडित महिलांना मदत आणि मार्गदर्शन केले जाईल.
एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “सासर काही वाईट नसते, पण काही ठिकाणी अप्रिय घटना घडत असतात. आपली मुलगी जशी लाडकी असते, त्याचप्रमाणे सूनही लाडकी असावी, यासाठी आम्ही हे अभियान सुरू केले आहे.”
हे अभियान विशेषतः सून आणि सासू यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी आणि प्रत्येक सुनेला घरात सन्मान मिळावा यासाठी सुरू करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या पुढाकाराने या अभियानाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
शिंदे यांनी एक्सवर (ट्विटर) माहिती दिली की, आपल्या घरात जशी आपली लेक लाडकी असते तशीच सूनही लाडकी असायला हवी. तिला योग्य वागणूक देऊन सन्मानाने वागवायला हवे, आणि जे असे करणार नाहीत त्यांना आता शिवसेना महिला आघाडी योग्य पद्धतीने धडा शिकवणार आहे. त्यासाठी ‘लाडक्या सुनेचे रक्षण हेच शिवसेनेचे वचन’ हे अभियान हाती घेणार आहे.
महिला कुटुंबासाठी सर्व काही करतात, पण स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आपली नियमित तपासणी करून घेण्यासाठी ठाणे मनपा आणि रोटरी क्लबच्या पुढाकाराने ‘उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान’ सुरू करण्यात आले असून जास्तीत जास्त महिलांनी त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील शिंदे यांनी केले.