रायगडमध्ये तुफानी पाऊस,
तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी….

अलिबाग दि १८ — रायगड जिल्ह्यात चार दिवसांपासून धुवांधार पाऊस कोसळत आहे. पावसाने अजून उसंत घेतलेली नाही. कधी जोरदार कधी जेमतेम मात्र, पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे उतरंडीला लागलेल्या नद्या पुन्हा भरून गेल्या आहे. जिल्ह्यातील तीन नद्यांनी सोमवार (१८ ऑगस्ट) दुपारी ३ वाजेपर्यंत धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा दिला आहे.
रायगड जिल्ह्यात सावित्री नदी (महाड), अंबा नदी (रोहा) आणि कुंडलिका (रोहा) या तीन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. सावित्री नदीची धोका पातळी ६.५० मीटर असून सध्या नदीची पातळी ६.५० मीटर आहे. तर अंबा नदीची धोका पातळी ९ मीटर असून नदीची पातळी ९.७० मीटर आहे. कुंडलिका नदीची धोका पातळी २३.९५ मीटर असून सध्या नदीची पातळी २४.१५ मीटर आहे.
त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांच्या सावधानतेचा इशारा दिला. याशिवाय आप्तकालीन यंत्रणा कामाला लागल्या आहेत.
पनवेलमधील गाढी नदी वेगाने इशारा पातळीजवळ येत असल्याने नदीजवळीला गावांना आणि रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाड तालुक्यात पूरस्थिती आहे.
सांदोशी आणि बावले कडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे संपर्क तुटला आहे. बिरवाडी गावाचा आसनपोईमार्गे संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे महाड, पोलादपूर तालुक्यांत अनेक ठिकाणी पाणी भरले आहे.
पेण तालुक्यातील कामार्लीमधील हेटवणे मध्यम प्रकल्प परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सकाळी ११ वाजून २८ मिनिटांनी धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. हे सहाही दरवाजे २० सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. सध्या धरणाची पाणी पातळी ८५.१० मीटर आहे आणि विसर्ग ११९.५४ घमी/सेकंद आहे. त्यामुळे भोगेश्वरी नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामानाचा अंदाज आणि धरणाच्या पाणलोटातील पावसाच्या तीव्रतेनुसार पुढील पूर परिस्थिती बाबतची अद्यावत माहिती दिली जाईल, असे रायगड जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
जिल्ह्यातील लहान, मोठे आणि मध्यम आकाराच्या २८ धरणांपैकी २४ धरणे १०० टक्के भरली असून त्यामधून सध्या विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकिनारी राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहावे, असा आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.ML/ML/MS