लेंडी नदीला पूर – रस्ते, घरे, शेती पाण्याखाली!

लातूर दि १८– लातूर, नांदेड आणि कर्नाटक सीमारेषेवर वसलेलं धडकनाळ गाव सध्या प्रचंड पाण्याच्या विळख्यात आलं आहे. लेंडी नदीच्या पुरामुळे गाव पूर्णपणे जलमय झालं असून वाहतुकीसह नागरिकांचं दैनंदिन जीवन ठप्प झालं आहे.
उदगीर–मुक्रमाबाद–देगलूर मुख्य रस्ता धडकनाळजवळ पूर्णपणे बंद पडला आहे. कर्नाटक व सीमाभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे लेंडी नदीला आलेल्या तुफान पुरामुळे बोरगाव आणि धडकनाळ गावत पाण्यात शिरले आहे.
शेतशिवारावरून इतक्या प्रचंड वेगाने पाण्याचा लोट गेला की शेतजमीन खरडून वाहून गेली. शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं आहे. हे दृश्य अक्षरशः धडकी भरवणारं आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. पुराच्या पाण्यात अडकण्याची शक्यता टाळण्यासाठी गावकऱ्यांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
धडकनाळ आणि परिसरातील पुरपरिस्थितीवर प्रशासनाची नजर आहे…!

बोरगावला देखील मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. शेत जमिनीचे नुकसान होऊन गुराढोर जिवानिशी मुकली आहेत. ७० शेळ्या, सात बैल, पाच म्हशी, दोन ट्रॅक्टर आणि एक पिकअप वाहून गेला यामुळे गावकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातील बोरगाव गावाला रात्रीतून झालेल्या मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली. गावात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. पु राच्या पाण्यामुळे शेतातील विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे, शेतातील शेड पाईपलाईन, ठिबक सिंचनाची यंत्रणा, गुरं-ढोरं आणि इतर शेतीसंबंधी साहित्य वाहून गेलं.
गावातील अंगणवाडी केंद्र, घरे, गोठे, किराणा दुकाने आणि घरगुती साहित्य पूर्णपणे पाण्याखाली गेले. कपडे, धान्य, किराणा आणि अन्य साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे साडेतीन हजार लोकसंख्येच्या गावातील शेकडो नागरिकांना घर सोडून मंदिरात आश्रय घ्यावा लागला. “अशा प्रकारचा पाऊस व एवढं मोठं नुकसान यापूर्वी कधीच झालं नव्हतं,” असे गावकऱ्यांचे मत आहे.ML/ML/MS