NCERT ने काँग्रेसला धरले फाळणीसाठी सर्वस्वी जबाबदार

नवी दिल्ली– NCERT ने आपल्या सुधारित अभ्यासक्रमात फाळणीचे गुन्हेगार या मथळ्याखाली एक नवा धडा समाविष्ट केला असून त्यात भारताच्या फाळणीचे सर्व खापर काँग्रेस पक्षावर फोडण्यात आले आहे. त्यामुळे नवा वाद उफाळून आला आहे.
एनसीईआरटीने (NCERT)इयत्ता सहावी ते आठवी आणि नववी ते बारावीसाठी नवा अभ्यासक्रम लागू केला आहे. त्यामध्ये देशाच्या फाळणीच्या भीषणतेवर फाळणीचे गुन्हेगार असा एक धडा आहे. त्यात मोहम्मद अली जिना, काँग्रस पक्ष आणि लॉर्ड माउंटबॅटन हे फाळणीला जबाबदार ठरवण्यात आले आहे.
जिना यांनी फाळणीची मागणी केली, काँग्रेसने ती मान्य केली आणि माउंटबॅटन यांनी ती अंमलात आणली,असे या धड्यात म्हटले आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणाचा उतारादेखील समाविष्ट करण्यात आला आहे. या भाषणात नेहरू म्हणाले होते, आपण अशा परिस्थितीत पोहोचलो आहोत जिथे आपल्याला एकतर फाळणी स्वीकारावी लागेल किंवा सतताचा संघर्ष आणि अराजकतेला तोंड द्यावे लागेल.
या धड्यात विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील एक उताराही जोडण्यात आला आहे. त्यात मोदींनी म्हटले की, फाळणीचे दुःख कधीही विसरता येणार नाही. लोकांच्या मुर्खपणा आणि द्वेषपूर्ण हिंसाचारामुळे आपल्या लाखो बहिणी आणि भाऊ विस्थापित झाले. अनेकांना प्राण गमवावे लागले. तो संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ आपले लोक १४ ऑगस्ट हा दिन फाळणीचा स्मृतिदिन म्हणून साजरा करतील.