कुंडेश्वर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांची नीलम गोऱ्हे यांनी घेतली भेट

पुणे दि. १६ — खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे दर्शनाला जात असताना सोमवारी दुपारी एकच्या सुमारास पिकअप दरीत कोसळून भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत १२ महिला भाविकांचा मृत्यू झाला तर २० पेक्षा अधिक महिला व लहान मुले जखमी झाले. या हृदयद्रावक घटनेनंतर विधानपरिषद उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्यक्ष भेटून सांत्वन केले, तसेच जखमींची साईनाथ हॉस्पिटल मोशी, खेड येथील सुश्रुत हॉस्पिटल आणि शिवतीर्थ हॉस्पिटल येथे जाऊन भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आणि धीर दिला.
पापळवाडीत पीडित कुटुंबीयांची भेट
या अपघातात मृत झालेल्या काही भाविकांचे कुटुंबीय पापळवाडी येथे राहत असून, डॉ. गोऱ्हे यांनी तेथे जाऊन प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी पीडित कुटुंबियांसोबत त्यांचा हृदयस्पर्शी संवाद झाला. शोकाकुल वातावरणात त्यांनी कुटुंबियांची समजूत काढली, त्यांना आधार दिला आणि या कठीण प्रसंगी राज्य शासन त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहील याची ग्वाही दिली.
अधिकाऱ्यांसोबत बैठक
या घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी राजगुरुनगर येथील शासकीय विश्रामगृहात तातडीची बैठक घेतली. या बैठकीस खेड विभागीय अधिकारी अनिल जी. दौंडे, निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे, पोलिस निरीक्षक अनिल दवडे, ग्रामविकास अधिकारी विशाल शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विलास माने यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारीही डॉ. गोऱ्हे यांच्यासोबत उपस्थित होते. त्यात इरफान सय्यद (शिवसेना उपनेते), भगवान पोखरकर (जिल्हा प्रमुख), सारिका पवार (महिला संपर्क प्रमुख), प्रकाश वाडेकर (उपजिल्हा प्रमुख), नितीन गोरे (महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य), विशाल पोतले (युवासेना तालुका प्रमुख), धनंजय पठारे (युवासेना जिल्हाप्रमुख), अभिजीत जाधव (चाकण युवासेना शहरप्रमुख), मयूर भुरूक (चाकण युवासेना उपशहरप्रमुख), पूजा राक्षे (राजगुरूनगर उपशहरप्रमुख), नैना जानकर (शहर प्रमुख), महादेव लिंबोरे (उपतालुका प्रमुख), विजय होरसाळे (उपजिल्हा प्रमुख), संदीप येळवंडे (उपतालुका प्रमुख) आणि शंकर घेनन (उपतालुका प्रमुख) यांचा समावेश होता.
प्रसारमाध्यमांशी संवाद
बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या,
“कुंडेश्वर येथे दर्शनाला जात असताना १२ महिला भाविकांचा अपघाती मृत्यू झाला ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. काही महिला आणि लहान मुले जखमी असून त्यांच्या उपचारांची जबाबदारी राज्य सरकारकडून घेतली जात आहे. राज्य शासन या सर्वांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे.”
त्या पुढे म्हणाल्या की, अपघाताच्या चौकशीत असे दिसून आले आहे की कुंडेश्वरकडे जाणाऱ्या धोकादायक वळणावर आवश्यक सुरक्षायंत्रणा नसल्याने हा अपघात घडला. त्यामुळे त्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारणे व इतर सुरक्षात्मक उपाय तातडीने करणे गरजेचे आहे. यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
नागरिकांना आवाहन
डॉ. गोऱ्हे यांनी या प्रसंगी नागरिकांना जागरूकतेचे आवाहन केले. त्या म्हणाल्या,
“राज्यात अनेक ठिकाणी नागरिक देवदर्शन किंवा पर्यटनासाठी जात असतात. प्रवासापूर्वी वाहनांची योग्य तपासणी करावी, चालकाने मद्यपान केलेले नसावे, तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी.”