किनखेडा गावात ढगफुटी, नदी नाल्याना पूर ….

वाशीम दि १६:– वाशीम जिल्ह्यात दुपारनंतर पावसाने पुन्हा जोर धरला असून मागील एका तासापासून सध्या संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. वाशिम तालुक्यातील किनखेडा गाव परिसरात आज दुपारी ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे गावातील रस्त्यांवर पाणी साचले तर अनेक घरांमध्येही पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले असून घरगुती साहित्याचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात या पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आल्याने नदी काठच्या शेतजमिनींमध्ये पाणी घुसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषत: सोयाबीन, कापूस, मूग आणि उडीद या खरीप पिकांना फटका बसण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने आधीच अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.