मांजरा प्रकल्प ९० टक्के भरला, नदीपात्रात ३४९४.२८ क्युसेक्स इतका विसर्ग…

लातूर दि १६:– लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बीड जिल्ह्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्प ९० टक्के क्षमतेने भरला आहे. पावसामुळे धरणात होणारी पाण्याची आवक पाहता पाणीपातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने आज दुपारी सव्वादोनच्या दरम्यान मांजरा प्रकल्पाचे चार दरवाजे ०.२५ मीटर उंचीने उघडून मांजरा नदीपात्रात ३४९४.२८ क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आला. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील मांजरा नदी काठावरील गावांमधील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तसेच कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात ९० टक्के पाणीसाठा झाल्याने लातूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मांजरा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला आहे.