सिंहगडावर जाण्यासाठी पूर्वनोंदणी बंधनकारक

पुणे ,दि. १५ : सिंहगडावर ट्रेकिंगसाठी जाण्यापूर्वी मोबाइल अॅपद्वारे पूर्वनोंदणी करणे आता बंधनकारक होणार आहे. नोंदणीची अट लागू होणारा सिंहगड हा राज्यातील पहिला किल्ला ठरणार आहे. वन विभागाने यासाठी ‘किल्ले सिंहगड’ हे विशेष मोबाइल अॅप विकसित केले आहे. सुरुवातीला ही योजना काही दिवस प्रायोगिक स्वरूपात राबवली जाईल आणि नंतर ती बंधनकारक केली जाईल.
सुट्टीच्या दिवशी घाटरस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे सुरक्षेच्या समस्या निर्माण होतात. यासाठीच वन विभाग दररोज गडावर प्रवेश देण्याची मर्यादा निश्चित करणार आहे. पर्यटकांची संख्या वाढल्यास अॅपद्वारे त्यावर नियंत्रण ठेवले जाईल. दिवसअखेर किती पर्यटकांनी गडावर प्रवेश केला याची अचूक नोंद वन अधिकाऱ्यांकडे असेल. अचानक गर्दी वाढल्यास गडाचा प्रवेश तत्काळ बंद करण्याचा निर्णय घेता येईल.
ही नवी प्रणाली पर्यटकांसाठी सोयीस्कर ठरणार असून, वन विभागालाही गर्दी व्यवस्थापनात मदत होईल. तसेच आपत्तीजनक परिस्थिती टाळण्यास आणि निसर्गाचे रक्षण करण्यास यामुळे मदत होईल, असं वन परिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले यांनी सांगितले.
SL/ML/SL